पावसाने ओढ दिल्यामुळे कांद्याच्या लागणीचा वांदा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

दुधेबावी - फलटण तालुक्‍यात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने हळव्या कांद्याच्या लागणी रखडल्याने अगामी काळात भाव वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या स्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

दुधेबावी - फलटण तालुक्‍यात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने हळव्या कांद्याच्या लागणी रखडल्याने अगामी काळात भाव वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या स्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

फलटण तालुक्‍यातून प्रामुख्याने उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर हळवा कांदा पाठवण्यात येतो. गेल्या हंगामात गरव्या कांद्याचे प्रचंड प्रमाणात उत्पादन घेतल्याने आणि कमी भाव मिळाल्याने फलटण तालुक्‍यात शेतकरी अडचणीत सापडला होता. सध्या गरव्या कांद्याचे भाव वाढले आहेत. मात्र, साठवणूक करून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. फलटण तालुक्‍यात अनेक ठिकाणी हळव्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागण करण्यात येते. मात्र, सध्या पाणी उपलब्ध नसल्याने कांद्याच्या लागणी करणे अवघड बनले आहे. नीरा कालव्याखालील शेतकरी हळवा कांद्याची लागण करून उत्पादन घेतात. मात्र, जास्त पाऊस झाल्यास कांदा नासण्याचा प्रकार घडतो. ऊस पिकानंतर कांदा लागणीमध्ये फलटण तालुका आघाडीवर असल्याने व्यापारीही बांधापर्यंत येऊन कांदा खरेदी करतात.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार
गेल्या हंगामात गरव्यास कमी भाव आणि सध्या हळव्याच्या लागणी रखडल्या असल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. परिणामी उत्तर भारतातही हळव्या कांद्यासाठी ग्राहकांना वाट पाहावी लागणार आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे प्रमुख नगदी पीक असलेल्या कांद्याची लागण न झाल्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

Web Title: dudhebavi satara news onion plantation