दुष्काळामुळे फळबागा झाल्या स्मशानासारख्या ओसाड : युवक शेतकऱ्यांची खंत

अक्षय गुंड
मंगळवार, 21 मे 2019

पूर्वी हिरव्यागार असलेल्या डाळींब, लिंबोणी, बोर व द्राक्षांच्या बागा आता या दुष्काळी परिस्थितीमुळे स्मशानासारख्या ओसाड झाल्या आहेत. या बागांकडे बघून शेतकर्‍यांचा जीव कासावीस होतोय. अनेक शेतकऱ्यांनी लिंबोणी, बोर, डाळिंबामधून चांगले उत्पन्न मिळवले. मात्र गेल्या काही वर्षांपासून जलस्त्रोतांची अवस्था बिकट झाली. त्यामुळे परिसरातील सर्व बागांचे अस्तित्व धोक्यात आले अन् पाण्याअभावी या बागा जागेवरच जळून गेल्या आहेत. अक्षरशः सरपण झाले आहे. 

उपळाई बुद्रूक(सोलापुर) : पूर्वी हिरव्यागार असलेल्या डाळींब, लिंबोणी, बोर व द्राक्षांच्या बागा आता या दुष्काळी परिस्थितीमुळे स्मशानासारख्या ओसाड झाल्या आहेत. या बागांकडे बघून शेतकर्‍यांचा जीव कासावीस होतोय. अनेक शेतकऱ्यांनी लिंबोणी, बोर, डाळिंबामधून चांगले उत्पन्न मिळवले. मात्र गेल्या काही वर्षांपासून जलस्त्रोतांची अवस्था बिकट झाली. त्यामुळे परिसरातील सर्व बागांचे अस्तित्व धोक्यात आले अन् पाण्याअभावी या बागा जागेवरच जळून गेल्या आहेत. अक्षरशः सरपण झाले आहे. या सरपण झालेल्या बागा तोडून बांधावर टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असुन बळीराजाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. हा दुष्काळ शेतकऱ्यांच्या जीवावर उठला असल्याची खंत बावी येथील युवा शेतकरी कृष्णात मोरे यांनी 'सकाळ' बोलताना व्यक्त केली.

माढ्याच्या पुर्व भागात पाण्याची प्रबळ शाश्वती नसल्यामुळे येथील शेतकरी उपलब्ध पाणी साठ्यावर शेती करतात; मात्र, अशी शेती करताना पावसाच्या अनियमितेचा सातत्याने सामना करावा लागत असल्यामुळे कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकाकडे येथील शेतकऱ्यांचा भर असायचा. त्यामुळे उपळाई बुद्रूक, रोपळे खुर्द, बावी, भुताष्टे या गावांमधील शेकडो शेतकरी लिंबू, बोर, डांळिब, द्राक्षे अशा फळबागांची लागवड करत. परंतु सध्याच्या भयाण दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. पाण्याअभावी लिंबू, डांळिब बागांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर लाखो रुपयांचे नुकसान सोसण्याची वेळ आली आहे. बावी येथील कृष्णात मोरे यांची लिंबोणीची बागा पाण्याअभावी पूर्णपणे जळुन चालली आहे. तर इतर बागायदारांची अवस्थाही फारशी चांगली नाही. ज्या बागा काही प्रमाणात जिवंत आहेत त्या टिकविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यासाठी काही शेतकरी टँकरद्वारे विकतचे पाणी आणून बागा वाचविण्याची धडपड करीत आहेत. ज्या ठिकाणी थोडेफार पाणी शिल्लक आहे, त्या ठिकाणावरील बागा अद्याप तग धरून आहेत. परंतु उन्हाच्या तडाख्याने झाडाला कोंब काही फुटेनासे झाले आहे. यामुळे या बागा जगविण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. बागा जगविण्यासाठी टँकरद्वारे पाण्यासाठी येणारा भरमसाट खर्च यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

दुष्काळाने बळीराजाचे हक्‍काचे जगण्याचे साधनच हिरावून घेतले आहे. डाळिंब, लिंबू व द्राक्षांच्या बागा जळाल्या असून त्याच्या तुराट्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान कोलमडून पडले असून बळीराजाचे स्वप्ने करपले आहे. त्यात सरकारचे वतीने बागांचे पंचनामे शेतकऱ्यांना दिलासा दिला खरा परंतु त्याचे अनुदान अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यासाठी शेतकरी बँकात हेलफाटे मारताना दिसत आहे. तरी शासनाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला जगवण्यासाठी तातडीने अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान जमा करावे. अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
 
दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी होणार...
बागा जगवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून पाण्याची सोय करावी लागत आहे. तरीही बागा जळुन चालल्या असुन उत्पादन मिळत नसल्याने पुन्हा कर्जाचा फास शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती आवळला जाण्याची भीती आहे. अशा कठीण प्रसंगी शासन व प्रशासनाने जगाच्या या पोशीद्यांच्या पाठीमागे उभे राहणे अपेक्षित होते.

''द्राक्षेची बाग जोपसण्यासाठी रात्रदिवस एक करत आहे. तरी देखील उन्हाच्या तडाख्याने द्राक्षेच्या झाडातुन उगवलेले कोंब जळुन चाललेले आहेत. या भागातील बरेचसे शेतकऱ्यांच्या बागा जळुन गेल्या आहेत.''
- संताजी पाटील द्राक्षे उत्पादक रोपळे खुर्द

''डाळींबाच्या बागेचा पंचनामे करून महिने उलटले. काहि शेतकऱ्यांचे अनुदान जमा झाले आहे. परंतु अद्यापही कित्येक शेतकऱ्यांचे दुष्काळ निधी जमा न झाल्याने शेतकऱ्यांसमोर कुटुंबाची उपजिवीका कशी करावी असा प्रश्न उभा आहे. तरी शासनाने तातडीने उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करावे.''
- लक्ष्मण चांगदेव जाधव डांळिब उत्पादक उपळाई बुद्रूक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to drought orchard were destroying says youth farmer