पंढरपूर : दुष्काळामुळे वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात

Due to drought the threat of wildlife survive at Pandharpur
Due to drought the threat of wildlife survive at Pandharpur

करकंब (ता. पंढरपूर) - वेळ दुपारी एकची... आकाशात डोक्यावरुन आग ओकणारा सर्यनारायण... संपूर्ण वनात वृक्षांचे केवळ सांगाडे... जंगल असूनही हिरव्या पानाचा पत्ताच नाही... खडकाळ जमिनीवरही गवाताची आडवी काडी नाही... बकाल बनलेल्या वनात शंभरएक वनगायींचा कळप विसावलेला... तहान आणि भुकेने व्याकूळ झालेल्या वनगायींना साधी सावलीही नाही... दूरवर चार-पाच हताश झालेली हरणे कान टवकारुन उभी... दुष्काळाची भयानक दाहकता दर्शिणारे हे चित्र आहे बार्डी (ता.पंढरपूर) येथिल वनाचे!

सध्या ग्रामीण भागामध्ये दुष्काळाची दाहकता चांगलीच जाणवू लागली आहे. एकीकडे भूगर्भातील पाणीपातळी खालावून विहीरी आणि बोअर कोरडे ठणठणीत पडत आहेत. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. शासनदरबारी पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या चालू करणे आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू करणे यासाठी दबाव वाढविला जात आहे. पण याचवेळी ग्रामीण भागातील जंगालांमधील वन्यप्राण्यांची चारा पाण्यावाचून अतिशय दयनीय अवस्था होत असताना प्रशासनाचे मात्र त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. 

पंढरपूर तालुक्यातील बार्डी आणि मेंढापूर परिसरात एकशे दहा हेक्टर क्षेत्रावर वन आहे. या नवात वनगायी, हरिण, काळवीट, ससे, लांडगे, खोकड, मोर, कोल्हा, आदी प्राण्यांचे वास्तव्य असायचे. पण दरवर्षी उन्हाळ्यात येथिल सर्वच वन्यप्राण्यांचे चारा-पाण्यावाचून हाल होत असतात. परिणामी हे प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेतात. मात्र अलीकडच्या काळात सिंचनासाठी ठिबकचा वापर वाढल्याने या प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. 'दैनिक सकाळ'च्या पाठपुराव्यानंतर या वनात पाण्यासाठी सिमेंटचे कुंड तयार करण्यात आले आहेत. मात्र त्यामध्ये वनविभागाकडून पाणी सोडले जात नाही. त्यामुळे ते सध्या कोरडे ठणठणीत पडले आहेत. परिणामी वन्यप्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. एवढेच नाही तर सध्या या जंगलातून ससे, खोकड, लांडगे, मोर, कोल्हा हे प्राणी हद्दपार झाल्यातच जमा आहेत. सध्या येथे वनगायी, हरिण आणि काळवीट हे प्राणी वास्तव्यास आहेत. मात्र संपूर्ण एकशे दहा हेक्टर क्षेत्रात या प्राण्यांसाठी गवताची आडवी काडीसुद्धा शिल्लक नाही की पिण्यासाठी पाण्याचा कोठे ठिपूसही दिसत नाही. एवढे होवूनही वनविभागाला मात्र याचे कसलेही गांभिर्य नाही. एके काळी हिरवाई आणि वन्य प्राण्यांनी समृद्ध असणारा हा परिसर आज अत्यंत बकाल बनला आहे. एकीकडे शासन शतकोटी वृक्षलागवड सारख्या योजना राबवून वनाच्छादित क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे आहे ते वनक्षेत्र आणि वन्य प्राणी धोक्यात येत आहेत. त्याकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष करत आहे, याबाबत वन्यप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com