निवडणुकीमुळे सापडले 21 वर्षांपासून फरार आरोपी! 

solapur
solapur

सोलापूर : लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हेगारांची यादी अद्ययावत करून त्यामध्ये शरिराविषयी गुन्हे करणारे, मालाविषयी गुन्हे करणारे तसेच अवैध व्यवसाय करणारे गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. 21 वर्षांपासून फरार असलेले आरोपीही पोलिस शोधून काढत आहेत. 

निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या कारवाईची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण सावंत उपस्थित होते. पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, ज्या आरोपीवर एक गुन्हा दाखल आहे, परंतू त्याच्याकडून आणखी एखादा गुन्हा घडण्याची शक्‍यता आहे. अशा आरोपीकडून चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्र घेण्याकरीता संबधीत तहसीलदार यांच्याकडे 5635 प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी 3213 आरोपींचे बंधपत्र घेण्यात आले आहेत. ज्या आरोपीवर दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा सराईत गुन्हेगाराकडून आणखी एखादा गुन्हा घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. अशा 824 आरोपीकडून चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्र घेण्याकरीता प्रस्ताव पाठविले होते, त्यापैकी 580 आरोपींचे चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्र घेण्यात आले आहे.' 

9 गुन्हेगार टोळीतील 42 जणांना सुमारे 18 ते 24 महिन्यापर्यंत सोलापूर शहरासह जिल्हयातून हद्दपार करण्यात आले आहे. उर्वरित गुन्हेगार टोळ्यांची चौकशी पूर्ण होताच योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. अभिलेखावरील 111 गुन्हेगाराविरूध्द हद्दपार करण्याचे प्रस्ताव पाठविले होते, यापैकी 19 सराईत गुन्हेगारांना संबधीत उपविभागीय दंडाधिकारी यांनी हद्दपार केले आहे. 

शिक्षा सुनावलेल्या 11 गुन्हेगाराविरूध्द हद्दपारीचे प्रस्ताव पाठविले होते, यापैकी एका गुन्हेगाराला हद्दपार केले आहे. बरेच आरोपी हे गुन्हा केल्यानंतर कायदेशीर कारवाई पासून वाचण्यासाठी फरार झाले होते. न्यायालयाने फरार घोषीत केलेल्या एकुण 92 आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात सन 1998 पासून फरार असलेले 4 आरोपी, सन 2003 पासुन फरार असलेले 3 आरोपी तसेच सन 2005 ते सन 2016 या कालावधी फरार असलेले 40 आरोपी व उर्वरित मागील 3 वर्षातील फरार असलेल्या आरोपींचा समावेश आहे. 

शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर आल्यानंतर फरार झालेल्या तिघांचा शोध घेण्यात आला आहे. सराईत गुन्हेगार व कुप्रसिध्द वाळू तस्कर आण्णाराव उर्फ पिंटू बाबूराव पाटील (रा. शेगाव ता. अक्कलकोट) याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. मालाविषयी गुन्हे केलेल्या दोन टोळयामधील 12 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

अवैध दारूप्रकरणात 1093 गुन्हेगाराकडून चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्र घेण्यात येत आहे, असेही पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. 

सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्‍यता असलेल्या 840 गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांना निवडणूकीच्या कालावधीत शांतता राहण्यासाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. धोकादायक असलेल्या 105 गुन्हेगारांना निवडणूकीच्या कालावधीत स्थानबध्द करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी उपद्रव करण्याची शक्‍यता असलेल्या 562 जणांना ताब्यात घेण्यात येईल. त्यांना मतदान करण्याची मुभा असेल. 
- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com