अतिवृष्टीने शेती पाण्यात ;सोयाबीन, घेवड्यासह कडधान्ये धोक्‍यात

अतिवृष्टीने शेती पाण्यात ;सोयाबीन, घेवड्यासह कडधान्ये धोक्‍यात

सातारा : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतात पाणी तुंबल्याने सोयाबीन, घेवड्यासह इतर कडधान्य पिके धोक्‍यात आली आहेत. सलग दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे खरीप पिके हातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. सातारा, कऱ्हाड, वाई, कोरेगाव तालुक्‍यांतील नगदी पीक आले व हळदीचे कंद कुजू लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करून पंचनामे सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे. 
आठवडाभरापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, तर गेल्या तीन चार दिवसांपासून सातारा, कऱ्हाड, पाटण, वाई, महाबळेश्‍वर, जावळी तालुक्‍यांत अतिवृष्टी होत आहे. परिणामी या तीन तालुक्‍यांतील जनजीवन विस्कळित झाले आहे. यासोबतच शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने खरिपाची पिके धोक्‍यात आली आहे. सोयाबीन व घेवडा पिकांत पाणी तुंबल्याने पाने पिवळी पडू लागली आहे. काही ठिकाणी कडधान्याची पिके पिवळी पडून कुजू लागली आहेत. सातारा, कोरेगाव, खटाव, वाई, कऱ्हाड तालुक्‍यातील नगदी पीक असलेल्या आले व हळदीचेही नुकसान होऊ लागले आहे. आले व हळदीच्या पिकांत पाणी तुंबल्याने संततधार पावसाने कंद कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे ही पिके पिवळी पडू लागली आहेत. या वर्षी आले व हळदीला मे, जूनमध्ये चांगला दर आल्याने या पिकाखालील क्षेत्र वाढले आहे. आता अतिवृष्टीमुळे ही पिकेही धोक्‍यात आली आहे. जुने आले लागू लागल्याने ते काढून टाकण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. त्यामुळे मिळेल तो दर घेऊन शेतकऱ्यांना गप्प बसावे लागत आहे. सध्या ही अतिवृष्टी ऊस पिकाला फायद्याची आहे. तर भुईमूग पीकही वाया जाण्याची भीती आहे. सध्याच्या परिस्थितीत पाऊस थांबण्याची आवश्‍यकता आहे. अन्यथा, खरिपाची सर्वच पिके वाया जाणार आहेत. पुढील एक- दोन दिवस अतिवृष्टी कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पाऊस उघडला आणि ऊन पडू लागल्यास सोयाबीन व भुईमूग पीक वाचण्याची चिन्हे आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com