अवैध धंद्यावरून कॉंग्रेस, भाजपमध्ये जुंपली 

संतोष कणसे
शनिवार, 20 मे 2017

कडेगाव - पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात अवैध धंद्यावरून कॉंग्रेस व भाजपमध्ये जोरदार जुंपली आहे. एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपाने मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अवैध धंदे हे राजकीय टोलेबाजीचे निमित्त असले तरी ही विधानसभेची रंगीत तालीम सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

कडेगाव - पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात अवैध धंद्यावरून कॉंग्रेस व भाजपमध्ये जोरदार जुंपली आहे. एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपाने मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अवैध धंदे हे राजकीय टोलेबाजीचे निमित्त असले तरी ही विधानसभेची रंगीत तालीम सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

कॉंग्रेसचे आमदार पतंगराव कदम व भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे येथील पारंपरिक राजकीय विरोधक आहेत. कॉंग्रेस सत्तेत नाही. तर केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असून पृथ्वीराज देशमुख हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने पलूस-कडेगाव या कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडून दोन्ही पंचायत समितीमध्ये सत्तांतर घडवत कमळ फुलविले. तर जिल्हा परिषदेतही मोठे यश संपादन केले. यात कॉंग्रेस बॅकफूटवर गेली. त्यानंतर कडेपूर गटांतून विजयी झालेले भाजपचे युवा नेते संग्रामसिंह देशमुख यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. तर यापूर्वी त्यांना जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्षपद ही मिळालेले आहे. 

पृथ्वीराज देशमुख यांचे महत्त्व वाढले. त्यांनीही मतदारसंघात विकासकामे करण्यास सुरवात केली आहे. तर सुखवाडी येथील कृष्णानदीवरील पुलासाठी मंजूर झालेला साडेचार कोटींचा निधी व कडेगाव नगरपंचायतीला मिळालेल्या एक कोटीचा निधी डॉ. पतंगराव कदम व पृथ्वीराज देशमुख यांनी आपणच आणला आहे असा दावा केला. तर कडेगाव येथे नगरपंचायतीच्या एका कामाचे कॉंग्रेस व भाजप यांनी स्वतंत्रपणे भूमिपूजन केले. अशा रीतीने येथे कॉंग्रेस व भाजपमध्ये विकासकामांवरून जोरदार श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. यामुळे येथील राजकीय वातावरण आता चांगलेच ढवळून निघाले आहे. विश्‍वजित कदम यांनी भाजपचे स्थानिक नेतृत्व वाळू तस्करांना पाठीशी घालत आहे, असा भाजपवर आरोप केला. तर पंचायत समितीच्या सभापती मंदाताई करांडे यांनी वाळू तस्कर हे भाजपचे नसून कॉंग्रेसचेच आहेत, असा पलटवार केला. त्यानंतर पतंगराव कदम यांनी दारू, मटका, वाळू आदी अवैध धंदे सध्या मोठ्याप्रमाणात फोफावले आहेत. असा आरोप करून भाजपवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला. त्यावर पृथ्वीराज देशमुख यांनी अवैंध धंद्यात भाजप नाही तर कॉंग्रेसवालेच असून कॉंग्रेसच्या काळापासून ते सुरू आहेत, असा प्रतिहल्ला केला. 

कदम कुटुंबीय सक्रिय 
कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपला अच्छे दिन आल्याने गेली पंधरा वर्षे राजकीय विजनवासात असलेले देशमुख कुटुंब जिल्ह्याचा राजकारणात केंद्रस्थानी आले. तर गेली पंधरा वर्षे राज्य व जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेले कदम कुटुंब हे सत्तेवरून बाजूला गेले. पतंगराव कदम, मोहनराव कदम हे दोन आमदार बंधू व युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम हे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे मतदार संघात चांगलेच सक्रिय झाले. त्यांनी तालुक्‍यात विविध विकासकामे करण्यावर व जनसंपर्कही वाढविण्यास सुरवात केली.

Web Title: Due to illegal trade, the Congress and BJP