सिंचन योजना कधी सुरु होणार : शेतकऱ्यांना लागलीय चिंता

Due to irrigation scheme not being started; farmers are in tension
Due to irrigation scheme not being started; farmers are in tension

सांगली ः जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ सिंचन योजना तातडीने सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे तीन आठवड्यापूर्वी तासगाव व मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांनी केली होती. पालकमंत्री व पाटबंधारे अधिकाऱ्यांनी एक मार्चपासून योजना सुरू करू, असे आश्‍वासन दिले होते. गेल्या वर्षी महापूर आणि अतिवृष्टी होऊनही पाणी पातळी खालावली आहे. मार्च उजाडला तरी योजना सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे. 

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये जिल्ह्यात महापूर आला. त्यानंतर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानंतरही तासगाव, मिरज पूर्व भागातील वाढलेली भूजल पातळी आता घटली आहे. वाढलेल्या पाणीपातळीवर आतापर्यंत शेती तरली. आता विहिरींची क्षमता संपत आली आहे. पाणी कमी पडू लागले आहे. तासगाव व मिरज पूर्व भागातून शेतकरी, लोकप्रतिनिधींनी 7 फेब्रुवारी रोजी पाटबंधारे कार्यालयात पालकमंत्री श्री. पाटील, आमदार सुमन पाटील यांच्यासह शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत जिल्ह्यातील सिंचन योजना तातडीने सुरू करण्याची मागणी झाली. मंत्री श्री. पाटील यांच्यासह पाटबंधारे अधिकाऱ्यांनी योजना एक मार्चपासून सुरू करू, असे आश्‍वासन दिले 

म्हैसाळ योजनेच्या लाभ क्षेत्रातील विहिरी आणि कूपनलिकांची पाणी पातळी तळाला गेली आहे. ओढे, नाले सारे आटले आहेत. गेल्यावर्षीपर्यंत डिसेंबर, जानेवारीच्या सुरवातीलाच ही स्थिती यायची आणि पाण्याची मागणी व्हायची. सरत्या वर्षातील दमदार पावसाने एक महिना उशिरा ही स्थिती आली आहे. शेतकऱ्यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांकडे सिंचन योजना सुरू करण्याची मागणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी आता तरी तातडीने पाणी देण्याची मागणी होत आहे. जितक्‍या उशिरा योजना सुरू होईल, तेवढा गोंधळ वाढेल, असे चित्र आहे. पाण्याची मागणी वाढली की यंत्रणेवर ताण येणार आहे. 

पाणी योजना तातडीने सुरू करण्याची गरज

जिल्ह्यातील सिंचन योजनांसह डोंगरवाडी पाणी योजनेही तातडीने सुरू करण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांना योजनेच्या जलवाहिन्यांपासून शेततळ्यात पाणी साठवायचे आहे. त्यांनाही रक्कम भरून पाणी देण्याची सोय केली पाहिजे. शेततळी भरून घेतल्यानंतर जून-जुलैपर्यंत बागायत पिकांची सोय होणार आहे.

- राजेंद्र माळी, सरपंच सोनी. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com