नव्वद टक्के कोचिंग क्लासेस डबघाईला ; चालकांच्या चिंतेत वाढ

सकाळ वृत्तसेवा | Monday, 26 October 2020

क्लासेसमुळे त्यांना थोडा हातभार लागतो, पण अद्याप परवानगी नसल्याने ते आर्थिकदृष्टया डबघाईस आले आहेत.

निपाणी (बेळगाव) : केंद्र शासनाने नियमावली जाहीर केल्याने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना काळाता 90 टक्के कोचिंग क्लासेस डबघाईला आले असून ते सुरु करण्यासाठीही सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी निपाणी तालुक्यातील क्लास चालवणाऱ्या शिक्षकांतून होत आहे. 

हेही वाचा -  हाताशी आलेले पीक बघता बघता होते फस्त -

अनलॉक 5 अंतर्गत शाळा, शैक्षणिक संस्था आवश्यक त्या कर्मचारी संख्येत घालून दिलेल्या नियमानुसार सुरु होणार आहेत. तालुक्यातील 90 टक्के कोचिंग क्लासेस शिक्षक हे लहान व मध्यम वर्गामध्ये मोडतात. अनेक खासगी शाळांमध्ये हे शिक्षक कमी वेतनात काम करत आहेत. क्लासेसमुळे त्यांना थोडा हातभार लागतो, पण अद्याप परवानगी नसल्याने ते आर्थिकदृष्टया डबघाईस आले आहेत. मास्क, सॅनिटायझरचे नियम पाळून क्लास सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

चिक्कोडी तालुक्यात 170 पेक्षा अधिक खासगी क्लासचालक आहेत. त्यात खासगी शाळांचे शिक्षक काम करत असल्याने त्यावर कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मार्चपासून लॉकडाउन जाहीर केल्यानंतर सर्व कोचिंग क्लासेस बंद झाले. तेव्हापासून मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. एप्रिल-जूनमध्ये विद्यार्थी क्लासमध्ये प्रवेश घेतात. मात्र कोरोनामुळे प्रवेश झालेला नाही. लॉकडाऊनमुळे बहुतांश लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शाळा, महाविद्यालयांबरोबरच शासनाला खासगी क्लासेस सुरु करण्याबाबतचे धोरण ठरवावे लागणार आहे. त्यासाठीचे नियम, निकष तयार करावेत, अशी भूमिका क्लासचालक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा - शेतात पाणी हाय म्हणून रस्त्यावर मळणी काढलीया -

विद्यार्थ्यांची अडचण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि क्लासचालकांचा व्यवसाय दोन्ही ठप्प आहेत. काही खासगी क्लासेस ऑनलाईन सुरू आहेत. मात्र पालक, विद्यार्थी म्हणावे तितके समाधानी नाहीत. ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना अडचणी येतच आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम