सात मुलींचा विनयभंग केल्याने वसतिगृह अधिक्षकाविरुध्द गुन्हा 

अभय जोशी 
मंगळवार, 10 जुलै 2018

काही मुलींनी वसतिगृहाचे अधिक्षक श्री. देशपांडे हे वसतिगृहातील मुलींच्या सोबत अश्‍लिल वर्तन करतात अशा आशयाची तक्रार केली. तेव्हा निर्भया पथकातील पोलिस अधिकाऱ्यांनी मुलींना विश्‍वास दाखवल्यावर मुख्य पिडीत मुलीने या संदर्भात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 

पंढरपूर - येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील सात विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याच्या कारणावरुन वसतिगृहाचा अधिक्षक संतोष प्रभाकर देशपांडे (वय 53 रा. गुरुकृपा सोसायटी, पंढरपूर) याच्या विरुध्द पोलिसांनी ऍट्रॉसिटी आणि बाल लैंगिक अत्याचारासह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पिडीत मुलींमध्ये काही अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. 

या घटनेची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातील निर्भया पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गजानन गजभारे, उपनिरीक्षक प्रिती जाधव या त्यांच्या अन्य पोलिस कर्मचाऱ्यांसह 9 जुलै ला वसतिगृहाला भेट देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी वसतिगृहातील मुलींशी संवाद साधून काही अडचणी आहेत का अशी विचारणा केली. तेव्हा काही मुलींनी वसतिगृहाचे अधिक्षक श्री. देशपांडे हे वसतिगृहातील मुलींच्या सोबत अश्‍लिल वर्तन करतात अशा आशयाची तक्रार केली. तेव्हा निर्भया पथकातील पोलिस अधिकाऱ्यांनी मुलींना विश्‍वास दाखवल्यावर मुख्य पिडीत मुलीने या संदर्भात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 

यातील मुख्य पिडीत मुलगी ही कायद्याचे शिक्षण घेत आहे. फेब्रुवारी महिन्यात एके दिवशी दुपारी देशपांडे याने इ मेल पाठवण्याच्या बहाण्याने आपल्याला कार्यालयात बोलवले. त्यानंतर त्याने अश्‍लील चाळे करण्यास सुरुवात केली. हा प्रकार तीने अन्य मुलींना रडत सांगितल्यावर अन्य सहा मुलींना देखील अशाच प्रकारचा अनुभव आला असल्याची माहिती समोर आल्याचे संबंधित मुलीने पोलिसांकडे दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी देशपांडे यास ताब्यात घेतले असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत भारती हे करीत आहेत.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Due to molestation of seven girls filed the complaint against hostel superintendent