दळणवळणाची सोय नसल्याने दोन कळ्यांचे बळी 

दळणवळणाची सोय नसल्याने दोन कळ्यांचे बळी 

गारगोटी - फयेपैकी लिंगडीचावाडा या धनगरवाड्यावर विषबाधा झाल्याने दोन मुलींचा मृत्यू झाला. त्यांच्या आईवडिलांवर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कविता कोंडीबा बाजारी (वय 7) व मंगल कोंडीबा बाजारी (वय 4) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. घटनेची भुदरगड पोलिसात नोंद झाली. रामा भागोजी मलगोंडा यांनी पोलिसात फिर्याद दिली. दरम्यान रात्री दळणवळणाची सोय नसल्याने व जोरदार पावसामुळे दोन्ही मुलींना वेळेत उपचार मिळाले नाहीत. 

पोलिसांनी सांगितले की, फयेपैकी लिंगडीचावाडा (धनगरवाडा) येथील कोंडीबा बाजारी, ठकूबाई बाजारी, मुली कविता आणि मंगल यांना अन्नातून विषबाधा होऊन जुलाबाचा त्रास सुरू झाला. रामा मलगोंडा यांना ही घटना समजताच ते बाजारी यांच्या घरी रात्री आठ वाजता गेले. तेव्हा घरातील सर्वजण आजारी पडल्याचे दिसले. रात्रीची वेळ, वाहन उपलब्ध होण्याची गैरसोय आणि रस्ता रहदारीचा नसल्याने त्यांनी सर्वांना सकाळी दवाखान्यात नेण्याचे ठरविले. दरम्यान, आज पहाटे चारच्या सुमारास कविताची हालचाल बंद झाली. तर पहाटे सहाच्या सुमारास मंगलची प्राणज्योत मालवली. यानंतर समाजाच्या रीतिरिवाजानुसार सकाळी घरापासून थोड्या अंतरावर त्यांचा दफनविधी केला. 

यानंतर रामा मलगोंडा वर्दी देण्यासाठी आले होते. या वेळी मुलींना दफन केल्याचे समजताच नायब तहसीलदार संदीप भूतल, पोलिस उपअधीक्षक अनिल कदम, पोलीस निरीक्षक संजय पतंगे, डॉ. रिन्डे यांनी घटनास्थळी भेट दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळी यांनी गारगोटी ग्रामीण रुग्णालयाला भेट रुग्णांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. 

जीवघेणी काळरात्र 

दोन्ही मुलींना गुरुवारी रात्री उलट्या सुरू झाल्या तेव्हा प्रचंड पाऊस होता. तेथे रस्ता नसल्याने जागेवर वाहन आणण्याची अडचण होती. यामुळे सर्वांनी सकाळी गारगोटीत दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय त्यांना अडचणीचा ठरला. कुटुंबातील सर्वच अत्यवस्थ असल्याने ग्रामस्थांनी रात्री जागून काढल्या. मात्र सकाळी दोन्ही मुलींना उपचारासाठी नेण्यापूर्वीच दोघींचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

तिघांची प्रकृती स्थिर 
वडील कोडींबा व आई ठकूबाई व लहान मुलगा यांना गारगोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे. शिळे अन्न खाल्याने ही घटना घडली असावी अशी चर्चा होती. यामुळे आरोग्य विभागाने अन्नाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. 

मृतदेह तपासणीसाठी बाहेर 
दफन केलेले दोन्ही मुलींचे मृतदेह तपासणीसाठी बाहेर काढले. नायब तहसीलदार संदीप भूतल, पोलिस निरीक्षक संजय पतंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, डॉ. उषा कुंभार, डॉ. मिलिंद कदम, डॉ. रिन्डे यांच्या समक्ष मृतदेह बाहेर काढले. उत्तरीय तपासणीसाठी ते शासकीय रुग्णालयात पाठविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com