'त्या' फाेटाेमुळे युवकांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

हे फाेटाे पोलिसांच्या निदर्शनास पडले. त्यानंतर सातारा पाेलिसांनी केली कारवाई. 

सातारा :  शाहू चौक ते चारभिंती परिसरात बेकायदा जमाव जमवून तलवारीने केक कापल्याप्रकरणी सहा युवकांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी ः दशरथ कांबळे याचा नुकताच वाढदिवस झाला. तो साजरा करताना त्याने मित्रांसोबत तलवारीने केक कापला. वाढदिवसाच्या सेलीब्रेशनचे फोटो त्याने सोशल मीडियावर टाकले. हे फाेटाे पोलिसांच्या निदर्शनास पडले. त्यानंतर पोलिसांनी शाेधाशाेध करुन संबंधितांवर आर्म ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे केक कापत असलेल्या फाेटाेत जितके युवक हाेते त्या सर्वांवर गुन्हा दाखल झाला आहे.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा

यामध्ये दशरथ कांबळे, शाकीब शेख, महेश गायकवाड, रोहित चव्हाण, जय गायकवाड, तोयबा (सर्व रा. शाहू चौक परिसर, सातारा) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी बड्डे बॉयला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून केक कापताना वापरण्यात आलेली तलवार जप्त करण्यात आली आहे. इतर संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.

तडीपार गुंडाची महाबळेश्‍वरात धास्ती

महाबळेश्‍वर : काही महिन्यांपूर्वीच तडीपारीतून मुक्त झालेला महाबळेश्‍वर येथील गुंड निकेश रामचंद्र जाधव (वय 28, रा. गणेश पेठ, महाबळेश्वर) याने पुन्हा आपली दहशत पसरवण्यास सुरवात केली आहे. रात्री- अपरात्री कोणाच्याही घरात घुसून चोऱ्या करणे, लोकांना धमकावणे असे प्रकार त्याने सुरू केले असल्यामुळे महाबळेश्‍वरचे लोक त्रस्त झाले आहेत, तर त्याला पुन्हा तडीपार करण्याची मागणी होत आहे.

महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात निकेश जाधव याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असून, पोलिसांनी केलेल्या शिफारशीनुसार वाईच्या पोलिस उपअधीक्षकांनी त्याला काही काळासाठी तडीपारही केले होते. त्याची मुदत संपल्यावर तो काही महिन्यांपूर्वी महाबळेश्‍वरमध्ये पुन्हा दाखल झाला.

रुपाली कुंभारदरेंचे धाडस

शनिवारी पत्रकार अजित कुंभारदरे हे काही कामानिमित्त परगावी गेले होते. त्यामुळे शिक्षक सोसायटीतील त्यांच्या घरी त्यांची वयोवृद्ध आई, पत्नी व लहान मुले होती. त्याच दिवशी मध्यरात्री दीडच्या सुमारास निकेश जाधव हा दारूच्या नशेत आला व दरवाजाची बेल वाजविली. अजित कुंभारदरे यांची पत्नी रुपाली यांनी दीर आले असावेत, असे समजून दरवाजा उघडला, तर दारूच्या नशेत तर्रर्र असलेला गुंड निकेश त्यांना दिसला. काही कळायच्या आतच त्याने रुपाली कुंभारदरे यांना धक्का देत घरात शिरकाव केला.

अजित कुंभारदरे यांच्या आई व लहान मुलांनी आरडाओरडा केला. मुख्य दाराजवळ असलेल्या टीव्हीच्या शोकेस मधील काही रक्कम घेऊन तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता; पण आरडाओरडा ऐकून आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले.

हा गुंड स्थानिकच असल्याने अनेक जण तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र, रुपाली कुंभारदरे यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे धाडस दाखविल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान या गुंडाला महाबळेश्वरमधून तडीपार करण्याची मागणी येथे जोर धरू लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due To That Photo, A Crime Was Registered Against The Youth