मंदीमुळे घटली वाहन विक्री 

तात्या लांडगे
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

उद्योग व्यवसायासह अन्य क्षेत्रात मंदीचे सावट कायम असून त्याचा सर्वाधिक फटका वाहन विक्रीला बसल्याचे चित्र आहे. सोलापुरातील अकलूज व सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील वाहनांची नोंदणी आठ हजाराने कमी झाली असून राज्यात असेच चित्र आहे.

सोलापूर : उद्योग व्यवसायासह अन्य क्षेत्रात मंदीचे सावट कायम असून त्याचा सर्वाधिक फटका वाहन विक्रीला बसल्याचे चित्र आहे. सोलापुरातील अकलूज व सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील वाहनांची नोंदणी आठ हजाराने कमी झाली असून राज्यात असेच चित्र आहे. मंदीमुळे महसुली उत्पन्नावर झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा परिवहन विभागाला दीड हजार कोटींचा फटका बसेल, असा अंदाज राज्य परिवहन विभागाच्या सूत्रांनी व्यक्‍त केला. 

लोकसंख्या वाढ अन्‌ वाहन खरेदीची दरवर्षीची वाढ गृहीत धरुन यंदा सोलापूर व अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास दरमहा सरासरी सात ते साडेसात हजार वाहन नोंदणी अपेक्षित होती. मात्र, एप्रिल 2019 पासूनच वाहनांच्या विक्रीत सरासरी दोन हजारांची घट झाल्याचे चित्र आहे. राज्यात पावसाची दडी अन्‌ तीव्र दुष्काळ, जीएसटीचा भूर्दंड, फायनान्स कंपन्यांचे वाढलेले व्याजदर आणि नोटाबंदीचा परिणाम वाहन विक्री व्यवसायावर झाला आहे. त्यातच आता 1 ऑक्‍टोबरपासून बॅंकेत तीनवेळा व्यवहार केल्यास जीएसटीसह 56 रुपयांचे अतिरिक्‍त शुल्क लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर हप्त्याने वाहन खरेदी करणाऱ्या वाहनचालकांनी वाहन खरेदीकडे पाठ फिरवल्याचे वाहन विक्रेत्यांनी सांगितले. 

अकलूज व सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे एप्रिल ते ऑगस्ट 2019 पर्यंत 33 वाहनांची नोंदणी झाली आहे. तर मागच्या वर्षी सुमारे 41 हजार वाहनांची नोंदणी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आठ हजार वाहनांची नोंदणी कमी झाली असून मागील दोन महिन्यात त्याचे प्रमाण खूपच कमी झाल्याने महसूलातही मोठी घट झाली आहे. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर 

वाहन नोंदणीची स्थिती (एप्रिल ते ऑगस्ट 2019) 
महिना  (2018)   (2019) 
एप्रिल  9,725     9,308 
मे        8,559     7,211 
जून     7,800     5,473 
जुलै    7,862     6,385 
ऑगस्ट 6,545    5,450 
एकूण 40,461   33,827


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to recession sales of vehicle reduces