पोलिसांच्या "वसुली'मुळे अकलूज भागात संताप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

अकलूज (सोलापूर) : अकलूजचा आज आठवडे बाजार होता. त्यामुळे माळशिरस, शेजारील माढा, करमाळा, सांगोला या तालुक्‍यातील शेतकरी आपले जनावरे विकण्यासाठी व भाजीपाला विकण्यासाठी येत असतात. हे लक्षात घेऊन अकलूजकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर दुचाकी, चारचाकी वाहने अडवून कागदपत्रांची पाहणी करण्याच्या नावाखाली पोलिस राजरोस "वसुली' करताना दिसून आले. हा प्रकार आज सकाळी 10 ते 11 या वेळेत सुरू होता. याबद्दल संताप व्यक्त होत आहे. 

येथील डॉ. इनामदार हॉस्पिटलपासून जयसिंह चौकापर्यंत रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता एका बाजूने सुरू आहे. आज आठवडे बाजार असूनही एका बाजूने रस्ता सुरू असताना वाहतुकीची सोय लावण्यासाठी दोन पोलिस शिपाई होते, मात्र वसुलीसाठी एका ठिकाणी चार पोलिस शिपाई वाहने अडवताना दिसले. 

या मार्गावर मागील दोन महिन्यांपूर्वी रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे एक महिला रस्त्यावरच प्रसूत झालेला प्रकार घडलेला आहे. या मार्गावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार, डॉ. समीर बंडगर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सतीश दोशी, बालरोग तज्ज्ञ बडवे, त्वचारोग तज्ज्ञ कुलकर्णी, लगतच डॉ. राजीव राणे कविटकर, बाल रोग तज्ज्ञ डॉक्‍टर मिलिंद जामदार, अनुपम हॉस्पिटल डॉ. योगेश फडे आदींचे दवाखाने आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. याठिकाणी अत्यवस्थ रुग्ण सतत येत असतात. परंतु चौकात रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी होती. अशावेळी पोलिस खात्याने अधिकचे पोलिस नेमून वाहतूक सुरळीत करण्यावर लक्ष देणे गरजेचे असताना ते "वसुली' करताना आढळून आले. याविषयी अकलूजकरांमध्ये व अकलूजला येणाऱ्या प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the "recovery" of the police Anger in the area of ​​Akaluj