रस्त्यांमुळे घटली काळविटांची संख्या 

परशुराम कोकणे
बुधवार, 2 मे 2018

सोलापूर - बुद्ध पौर्णिमेनिमित्त नान्नज माळढोक अभयारण्य परिसरासोबत सिद्धेश्‍वर वनविहार, कोंडी, हिरज यासह विविध ठिकाणच्या पाणवठ्यांवर वन्यजीव गणना करण्यात आली. नान्नज अभयारण्य परिसरात एक मादी माळढोक पक्षी दिसला. रस्त्याच्या कामांमुळे काळविटांचा समूह स्थलांतरित झाल्याने त्यांची संख्या कमी नोंदवली गेली आहे. 

नान्नज अभयारण्य परिसरातील नान्नज, अकोलेकाठी, मार्डी, कारंबा, गंगेवाडी, पिंपळा, नरोटेवाडी, वडाळा अशी सात गावांमधील पाणवठ्यांवर वनपरिक्षेत्र अधिकारी के. एन. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. यात वनपाल जी. वाय. कुलकर्णी, जी. डी. दाभाडे, वनरक्षक बी. डी. ठेंगील, जी. एन. विभूते, एस. जी. जवळगी, एस. आर. कुर्ले, वनमजूर बी. बी. मस्के, एस. ए. साठे, सुधीर गवळी, सी. व्ही. व्हनमोरे यांच्यासह वन्यजीवप्रेमी सहभागी झाले होते. एकूण 32 प्रगणकांच्या साह्याने ही गणना करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लांडग्यांची संख्या कमी झाली आहे. याचे कारण लांडग्यांचा समूह फुटून काही लांडग्यांचे स्थलांतर झाले आहे. तसेच काळविटांच्या संख्येतही मोठी घट आढळून आली आहे. 

लांडग्यांच्या संख्येतही घट 
गेल्या वर्षी 277 काळविटांची नोंद झाली होती. यंदा 196 काळवीट दिसून आले. रस्त्यांच्या कामामुळे काळविटांचा समूह विभागला गेला आहे. लांडग्यांची संख्या 38 होती, ही संख्या 11 इतकी नोंदविली गेली आहे. खोकड 15 होते, त्यांची संख्या 27 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी माळढोक पक्षी एक दिसला होता, यंदाही एकच पक्षी दिसला आहे. नान्नज परिसरातील वन्यजीवांची गणना वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार बुद्ध पौर्णिमेच्या एक दिवस आधी करण्यात आली; तर सिद्धेश्‍वर वनविहारातील गणनेला सोमवारी दुपारी सुरुवात झाली. मंगळवारी दुपारपर्यंत गणना करण्यात आली. 

Web Title: Due to roads the number of Blackbuck got lost