परंपरा दुष्काळाची अन्‌ आर्त हाक सोलापूरकरांची..! 

अभय दिवाणजी
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

सोलापूर : उन्हाळा अजून दूर असतानाच दुष्काळाच्या टंचाईचे चटके आताच सुरू झालेल्या सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (बुधवारी) येत आहेत. दुष्काळाबरोबरच उजनीच्या पाण्याचे नियोजन, नमामी चंद्रभागा, उड्डाणपूल, सुरळीत पाणीपुरवठा, उद्योगांसाठी सुविधा, विमानतळाची उभारणी, स्मार्ट सिटी, अडचणीतील साखर कारखानदारी, नाडलेला शेतकरी अशा एक ना अनेक प्रश्‍नांच्या सोडवणुकीचे मुख्यमंत्र्यांना या दौऱ्यानिमित्त साकडे घालावे लागणार आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस अनेक महिन्यांच्या खंडानंतर सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामुळे काही प्रश्‍न मार्गी लागतील या आशेने सोलापूरवासीय सुखावले आहेत. तीन वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या शहरातील दोन उड्डाणपुलासाठी एकही वीट हलली नाही. बोरामणी विमानतळासाठीची भूसंपादनाची प्रक्रियाही ठप्प आहे. होटगी रस्त्यावरील विमानतळावरून विमानाचे उड्डाण होत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंढरपूरच्या विकासाबाबत केवळ घोषणाबाजी झाली. पुढे हालचाल मात्र ठप्प आहे. नमामी चंद्रभागा कागदावरच राहिली आहे. त्यासंदर्भात अजूनही सरकारने काहीही तसदी घेतलेली दिसत नाही. नेहमीप्रमाणे पुण्यातील पावसामुळे उजनी जलाशय 110 टक्के भरला. सध्या तो 96 टक्‍क्‍यांवर आलेला आहे. त्याचे योग्य नियोजन न झाल्याने भविष्यात पुन्हा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे उजनीतील पाण्याच्या नियोजनाचा विषय ऐरणीवर आहे.

एकीकडे कारखान्यांना घातलेल्या उसाचे पैसे मिळालेले नसल्याची शेतकऱ्यांची ओरड असताना उसावरील हुमणी रोगाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले. जिल्ह्यात गतवर्षी 31 साखर कारखान्यातून एक कोटी 69 लाख 74 हजार 187 टन ऊस गाळप झाले. हा उच्चांक नोंदविला गेला. यंदा कारखाने गाळपासाठी तयार आहेत. परंतु त्यांच्यासमोर एफआरपी, संघटनांचे आंदोलन, बँकांची वाढती कर्जे असे एक ना अनेक प्रश्‍न आ वासून उभे आहेत. प्रशासक असलेल्या जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत. कर्जमाफीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. 40 हजार कर्जदारांची यादीच प्राप्त न झाल्याने तब्बल 253 कोटी रुपये शासन दरबारी लटकले आहेत. दरम्यान, 70 हजार कर्जदारांना वसुलीच्या नोटीसा दिल्या आहेत.

दृष्टीक्षेप... 
टेक्‍स्टाईल पार्कची उभारणी 
नव्या एमआयडीसीची उभारणी 
गारमेंट पार्कसाठी सुविधा 
महापालिका परिवहन सेवेला उर्जितावस्था 
स्मार्ट सिटीच्या कामांना गती 
पोलिसांची तोकडी संख्या 
सोलापुरातील गाळ्यांचा प्रश्‍न 
पक्षांतर्गत गटबाजीचे ग्रहण

Web Title: Due to tradition of drought in Solapur