विधानसभेला सांगली जिल्ह्यात वंचितमुळे धाकधूक

विधानसभेला सांगली जिल्ह्यात वंचितमुळे धाकधूक

सांगली - विधानसभा निवडणूक अवघी तीन महिन्यांवर आली असताना लोकसभेच्या निकालाने सारे पट बदलून गेले आहेत. लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी घेतलेल्या मतांचा आकडा विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करेल, असेच संकेत देणारा आहे.

पडळकर यांनी लोकसभेला भाजपची डोकेदुखी वाढवली होती, विधानसभेला मात्र चित्र वेगळे असू शकेल. खानापूर, जत, मिरज आणि तासगाव-कवठेमहांकाळ या चार मतदार संघात त्यांचा प्रभाव राहू शकतो. या स्थितीत ‘वंचित’ला आघाडीबरोबर घेतले जावे, यासाठी आघाडीतील इच्छुकांना देव पाण्यात घालावे लागणार आहेत. अन्यथा, लढती अधिक कठीण होतील, असे आकडेच सांगताहेत. 

कोण कोठून उभारणार याचीची उत्सुकता...

खानापूर विधानसभा मतदार संघातून गोपीचंद पडळकर पुन्हा रिंगणात असू शकतील. त्याशिवाय जतमधून ‘वंचित’च्या संस्थापकांपैकी एक असलेले माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि तासगाव-कवठेमहांकाळमधून जयसिंग शेंडगे निवडणूक लढवतील, अशी दाट शक्‍यता आहे. याशिवाय, मिरज मतदार संघातही त्यांच्याकडून तयारी सुरु असून काँग्रेस-राष्ट्रवादीतील गर्दी पाहता त्यापैकी एखादा आपल्याकडे खेचण्याचे मनसुबे ‘वंचित’कडून आखले जात आहेत. या चारही मतदार संघात ‘वंचित’मुळे काँग्रेस आघाडीची वोट-बॅंक निश्‍चितपणे अस्थिर होऊ शकते, अशी चर्चा सुरु झाली आहे. 

जतमध्ये जगताप-सावंत-शेंडगे लढतीची शक्यता

जत मतदार संघात भाजपचे आमदार विलासराव जगताप, काँग्रेसचे विक्रम सावंत विरुद्ध ‘वंचित’कडून प्रकाश शेंडगे अशी लढत होऊ शकते. तसे झाल्यास काँग्रेसच्या अडचणी वाढतीलच, शिवाय शेंडगे यांच्या दणक्‍यात २००९ ला पराभूत झालेल्या जगताप यांच्यासाठीही आव्हान कठीण बनू शकेल. येथे पडळकरांनी तब्बल ५३ हजार मते घेतली आहेत. ती संजयकाकांपेक्षा १५ हजारने कमी असली तरी विशाल यांच्यापेक्षा २२ हजाराने जास्त आहेत. 

खानापूरात पडळकरांची शक्यता

खानापूर मतदार संघ हा गोपीचंद पडळकर यांचे होमपिच होता. तेथे विधानसभेला शिवसेनेकडून आमदार अनिल बाबर विरुद्ध आघाडीकडून (काँग्रेस किंवा राष्ट्रवादी) माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या लढतीत गोपीचंद फॅक्‍टर कमालीचे रंग आणेल. आटपाडीत देशमुखांचा गोपीचंद यांच्याशी असलेला जुना पैरा विरोधकांचा खूपच अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे ‘वंचित’ची चिंता जितकी सदाभाऊंना असेल तितकीच ती अनिलभाऊंनाही असणार आहे. येथे गोपीचंद हे संजयकाकांपेक्षा अवघ्या एक हजार मताने पिछाडीवर आहेत. 

तासगावमध्ये राष्ट्रवादीस वंचितकडून डोकेदुखी

तासगाव मतदार संघ याघडीला राष्ट्रवादीसाठी तुलनेत सुरक्षित वाटत असला तरी ‘वंचित’चा मोठा फटका त्यांना बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पक्ष, गट, जात आणि जुनी समीकरणे पडताळून पाहिल्यास येथे वंचितकडून जयसिंगराव शेंडगे यांची उमेदवारी राष्ट्रवादीची डोकेदुखी ठरू शकते. भाजपकडून येथे अजितराव घोरपडे मैदानात असतील तर राष्ट्रवादीकडून आमदार सुमनताई पाटील लढतील.

अशावेळी पारंपारिक घोरपडे विरोधक म्हणून पाहिला जाणारा धनगर मतांचा टक्का सुमनताईंच्या वाट्याला न जाता जयसिंगतात्यांकडे वळाला तर..? ही झाली अर्धी बाजू, घोरपडे यांच्याशी कवठेमहांकाळच्या ‘होम पीच’वर स्थानिक उमेदवार, हा वजाबाकी करणारा फॅक्‍टर ठरू शकतो, मात्र जास्त चिंता आघाडीलाच असेल. संजयकाकांच्या या गडात वंचितने ५४ हजार मते घेतली आहेत, हे दुर्लक्षित करून चालणारे नाही. विशेष म्हणजे ही मते, विशाल पाटील यांच्यापेक्षा साडेसहा हजार मतांनी जास्त आहेत. 

मिरजेत काँग्रेसने वोटबँक फुट टाळण्याची गरज

राहिला विषय मिरज मतदार संघाचा. येथे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून बाळासाहेब होनमोरे, ॲड. सी. आर. सांगलीकर, प्रा. सिद्धार्थ जाधव, आनंदराव डावरे हे नेहमीचे चेहरे चर्चेत आहेत. यापैकी एकालाच उमेदवारी मिळेल. त्यामुळे येथे ‘वंचित’ला ताकदीचा उमेदवार शोधावा लागणार नाही. अर्थात, येथे आधीच काहींनी तयारी सुरु केली आहे. या मतदार संघात काँग्रेसच्या वोटबॅंकेतील उभी फूट भाजपला फायद्याची ठरत आली आहे. ती टाळता आली नाही तर काँग्रेसकडे अवसानच उरणार नाही, असे इतिहास सांगतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com