पदाधिकाऱ्यांच्या सन्मानाने मावळत्या सभागृहास निरोप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहातील सदस्य व पदाधिकाऱ्यांचा आजच्या शेवटच्या सभेत सत्कार करत निरोप देण्यात आला. या वेळी सदस्यांनी पाच वर्षांत जसे सहकार्य केले, तसेच सहकार्य यापुढेही करावे, असे आवाहन प्रशासनाला केले. 

प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी, मावळत्या सभागृहातील सर्व सदस्य आणि पदाधिकाऱ्यांसाठी आमची दालने खुली असून केव्हाही आलात तरी तुमचे स्वागतच करू, अशी ग्वाही दिली. जाहीर केलेले राजर्षी शाहू पुरस्कार येत्या १५ दिवसांत वितरीत करण्याचे आश्‍वासन सभाध्यक्ष विमल पाटील यांनी दिले.

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहातील सदस्य व पदाधिकाऱ्यांचा आजच्या शेवटच्या सभेत सत्कार करत निरोप देण्यात आला. या वेळी सदस्यांनी पाच वर्षांत जसे सहकार्य केले, तसेच सहकार्य यापुढेही करावे, असे आवाहन प्रशासनाला केले. 

प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी, मावळत्या सभागृहातील सर्व सदस्य आणि पदाधिकाऱ्यांसाठी आमची दालने खुली असून केव्हाही आलात तरी तुमचे स्वागतच करू, अशी ग्वाही दिली. जाहीर केलेले राजर्षी शाहू पुरस्कार येत्या १५ दिवसांत वितरीत करण्याचे आश्‍वासन सभाध्यक्ष विमल पाटील यांनी दिले.

दरम्यान, आयत्या वेळच्या विषयावरून शेवटच्या सभेतही किरकोळ गोंधळ झाला. मात्र आजच्या विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषदेची नुकतीच निवडणूक झाली. नवीन सदस्य निवडून आले आहेत. मावळत्या सभागृहाची मुदत २० मार्चपर्यंत आहे. त्यामुळे आजची जिल्हा परिषदेची सर्वसाधारण झालेली सभा ही सदस्यांची तांत्रिकदृष्ट्या शेवटची सभा होती. त्यामुळे या सभेस सर्व सदस्य उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र अनेक जण गैरहजर राहिले. त्यामध्ये बांधकाम समिती सभापती सीमा पाटील व महिला, बाल कल्याण समिती सभापती ज्योती पाटील यांचाही समावेश होता.  

प्रशासनाच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचा शाल, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सदस्यांची भाषणे झाली. या वेळी अनेक सदस्यांनी कामाच्या ओघात जर अधिकारी दुखावले असतील तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्‍त केली. नवीन येणाऱ्या सदस्यांना प्रशासनाने समजावून घ्यावे, त्यांना प्रशिक्षण द्यावे, महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी, अशा सूचना केल्या. 

शाळांच्या इमारत बांधकामाबाबतही आजच्या सभेत चर्चा झाली. आवश्‍यक असणाऱ्या शळांनाच खोल्या बांधण्यासाठी परवानगी द्यावी, त्यासाठी नियोजन मंडळात निधीची स्वतंत्र तरतूद करावी, अशी मागणी केली. मागासवर्गीय व्यक्‍ती व महिलांना झेरॉक्‍स मशीन, मुलींसाठी सायकल खरेदी करण्याच्या निविदेस मंजुरी देण्यात आली. शिवणयंत्राची रक्‍कम थेट लाभार्थ्यांच्या नावावर जमा करण्याच्या विषयालाही मंजुरी आजच्या सभेत दिली. 

गेल्या दोन वर्षांपासून जाहीर झालेल्या राजर्षी छत्रपती शाहू पुरस्काराचे अद्याप वितरण झाले नसल्याबद्दल अनेक सदस्यांनी खंत व्यक्‍त केली. त्यावर या पुरस्काराचे वितरण येत्या पंधरा दिवसांत करण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली.

आजच्या चर्चेत उपाध्यक्ष शशिकांत खोत, अरुण इंगवले, मेघाराणी जाधव, धैर्यशल माने, सुरेश कांबळे, विजया पाटील, प्रकाश पाटील, प्रा. संजय इंगवले, अर्जुन आबिटकर, स्मिता आवळे, सुवर्णा अपराज, सुजाता पाटील, एकनाथ पाटील, पक्षप्रतोद शहाजी पाटील, राहुल देसाई, विकास कांबळे, परशुराम तावरे आदींनी भाग घेतला.

सर्वांची मते ऐकून घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. खेमणार यांनी, मावळत्या सभागृहातील सदस्यांसाठी अधिकाऱ्यांची सर्व दालने नेहमी खुली राहतील. त्यांचे चांगल्या पद्धतीने स्वागत केले जाईल, अशी ग्वाही दिली.

जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील यांनी, माझ्यासारख्या अल्पशिक्षित महिलेच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत जिल्हा परिषदेचा नावलौकिक देशपातळीवर पोचविला आहे. त्यामुळे आपली कारकीर्द प्रत्येक महिलेसाठी एक प्रेरणा ठरेल, असा विश्‍वास व्यक्‍त केला. त्या म्हणाल्या, ‘‘आपण अध्यक्ष होऊ, असे स्वप्नातही कधी वाटले नाव्हते. पण आरक्षणामुळे ती संधी मिळाली. अडीच वर्षाच्या काळात सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे खूप सहकार्य आपणास लाभले. त्यामुळेच कारकीर्द यशस्वी करू शकलो.’’

ड्रायव्हर संघटनेचे अध्यक्ष कोण?
महिला सदस्यांचे पतीही त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेत येत असतात. पतीना गमतीने ड्रायव्हर असे म्हटले जाते. मावळत्या सभागृहातील काही सदस्यांच्या पत्नी निवडून आल्या आहेत. उपाध्यक्ष शशिकांत खोत यांचे भाषण सुरू असतान एका सदस्याने, आता ड्रायव्हर संघटनेचे अध्यक्ष कोण? असा सवाल केला. यावर श्री. खोतच सध्या सीनियर आहेत, अशी टिप्पणी दुसऱ्या सदस्याने केली.

आमच्यावरच सत्ता अवलंबून
शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक म्हणाले, ‘‘येत्या सभागृहात जरी आपण नसलो तरी जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची आणायची हे आम्हीच ठरविणार आहे.’’

Web Title: During the farewell party of the dignity of the house