धुळीत हरवला पोवई नाका!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

सातारा - ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शहरातील वाहतुकीचे तीन-तेरा वाजले असतानाच या कामामुळे व खराब रस्त्यांमुळे पोवई नाका परिसरात संपूर्णपणे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांबरोबर वाहनचालकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

सातारा - ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शहरातील वाहतुकीचे तीन-तेरा वाजले असतानाच या कामामुळे व खराब रस्त्यांमुळे पोवई नाका परिसरात संपूर्णपणे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांबरोबर वाहनचालकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

पोवई नाका येथे आठ महिन्यांपासून ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम सुरू झाले. त्यामुळे धुळ उडत होती. काम वाढत गेल्यामुळे खोदकामाची ठिकाणेही वाढली आहेत. सध्या सयाजीराव महाविद्यालयासमोर, आयडीबीआय बॅंकेसमोर, त्याचबरोबर तहसीलदार कार्यालय व पोस्ट कार्यालयासमोर खोदकाम सुरू आहे. खोदकामाची व्याप्ती वाढल्यामुळे हवेतील धुलीकणांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. खोदलेली माती डंपरमध्ये भरत असतानाही मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे.

ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शहरातील वाहतुकीतही मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडलेले होते. ते बुजविण्यासाठी मातीमिश्रित मुरमाचा वापर करण्यात आला होता. पाऊस संपल्यानंतर पडलेल्या उन्हामुळे या मातीची धूळ बनली आहे. त्यामध्ये ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे उडणाऱ्या धुळीची भर पडली आहे. 

वाढलेल्या धुळीमुळे रस्त्यावरून जाताना समोर मोठे वाहन असले तर, उडणाऱ्या धुळीमुळे दुचाकीस्वार व पादचाऱ्यांच्या नाका-तोंडात तसेच डोळ्यात मोठ्या प्रमाणावर धूळ जात आहे. त्यामुळे अनेकदा अपघाताचे प्रसंगही घडत आहेत. गॉगल घालूनच गाडी चालवायची, अशी परिस्थिती साताऱ्यात निर्माण झाली आहे. वाहनधारकांबरोबर परिसरातील रहिवाशी व कार्यालयांमध्येही धुळीचा त्रास होत आहे. त्यामुळे इमारतीमधील खोल्या 
व कार्यालयांमध्ये धुळीचे थर साचत आहेत. या रस्त्यांवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही तोंड बांधून जावे लागत आहे. 

या धुळीचा सातारकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. पावसाळा संपला तरी, सातारकरांच्या घशाचे व श्‍वसनाचे आजार संपले नाहीत. डोळ्यांच्या विकारातही वाढ झाली आहे. ॲलर्जीचा त्रासही वाढला आहे. काही त्वचारोगही होत आहेत. धुळीचा हा त्रास थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

हवेतील धूलिकणांमध्ये वाढ
पोवई नाका परिसरात सुरू असलेल्या कामामुळे हवेतील धूलिकणांमध्ये किती वाढ झाली आहे, याबाबतचे ‘मॉनिटरिंग‘ करून नमुने घेण्यात आले आहेत. ते तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित यंत्रणेला सूचना केल्या जातील, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बाळासाहेब कुकडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. संबंधित ठिकाणी पाणी फवारणी करून धूलिकणांवर नियंत्रण आणता येऊ शकते, असेही ते म्हणाले.

आरोग्यावर गंभीर परिणाम 
धुळीमध्ये अनेक आजारांच्या विषाणूंचा समावेश असतो. त्यामुळे फ्लू व इतर संसर्गजन्य आजार वाढतात. नाका-तोंडावाटे ती पोटात जाते. त्यातून जंत तसेच पोटाचे इतर आजार होऊ शकतात. त्वचारोग व डोळ्यांचे आजारही होतात. दमा व हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ती धोकादायक ठरते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डोळ्याला गॉगल व तोंडाला रुमाल बांधावा. पूर्ण शरीर झाकणारे कपडे घातल्यास त्वचारोग टाळता येऊ शकतात.

Web Title: Dust Powai naka Road Transport