साताऱ्यात चर्चा एकच ‘कौन बनेगा उपाध्यक्ष’

साताऱ्यात चर्चा एकच  ‘कौन बनेगा उपाध्यक्ष’

राजू भोसले, आंबेकर, अल्लीशेठ, लेवे आदींची नावे चर्चेत 
सातारा - नगराध्यक्षपदासाठी सातारा विकास आघाडीने फ्रेश चेहरा दिल्याने उपाध्यक्ष म्हणजे नॉन स्ट्राइकवरील फलंदाज बिनीचा दिला जाण्याची शक्‍यता आहे.

नगराध्यक्षपदासह तब्बल २२ जागांवर मुसुंडी मारणाऱ्या सातारा विकास आघाडीचा उपाध्यक्ष कोण असणार, याविषयी साताऱ्यात मोठी उत्सुकता आहे. माजी नगरसेवक राजू भोसले, श्रीकांत आंबेकर, अल्लाउद्दीन शेख, वसंत लेवे, किशोर शिंदे ही नावे चर्चेत आहेत. पालिका निवडणुकीनंतर सध्या ‘कौन बनेगा उपाध्यक्ष’ एवढीच शहरात चर्चा आहे. 

नगराध्यक्षपदासह २२ जागा घेत सातारा विकास आघाडीने पालिकेत बहुमत मिळवले. १२ जागा मिळालेली नगर विकास आघाडी प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसणार आहे. भाजपनेही सभागृहात विरोधी बाकांवर बसण्याचे मनसुबे जाहीर केले आहेत. येत्या आठवड्याभरात नवनिर्वाचित उमेदवारांची पहिली सभा बोलावली जाईल. त्यात उपाध्यक्षाची निवड होणार आहे. माधवी कदम यांच्या रूपाने ‘साविआ’ने नगराध्यक्षपदासाठी फ्रेश चेहरा दिला आहे. पालिका कामकाजाची पद्धत आत्मसात करण्यासाठी त्यांना काही काळ द्यावा लागेल. अशा वेळी पालिकेच्या कामकाजात सक्षम व आक्रमक उपाध्यक्षाची गरज असल्याने हे पद अनुभवी व ज्येष्ठ सदस्याकडे दिले जाण्याची शक्‍यता आहे. 

प्रभाग एकमधून निवडून आलेले राजू भोसले हे खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांच्या पत्नी संगीता भोसले या १९९१ ते ९६ मध्ये नगरसेविका होत्या. २००१ मध्ये उदयनराजे यांनी राजू भोसले यांना स्वीकृत सदस्य म्हणून पाच वर्षे पालिकेत काम करण्याची संधीही दिली. हॉटेल मालक संघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. कुशल संघटक व मितभाषी म्हणून ते परिचित आहेत. सातारा विकास आघाडीने सतीश जाधव यांचा राजीनामा घेतल्याने २००४ मध्ये पोटनिवडणूक झाली. त्यात श्रीकांत आंबेकर यांना दोन वर्षे नगरसेवकपदाची संधी मिळाली. त्यानंतर गत निवडणुकीत स्वाती आंबेकर या अपक्ष निवडून आल्या. यावेळी श्री. आंबेकर यांनी मोठे आव्हान पार केल्याने त्यांना संधी दिली जाऊ शकते. 

यापूर्वी दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले वसंत लेवे उपाध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. मुक्ता लेवे यांनी सभापतिपदासह नगराध्यक्षपदी काम केले आहे. २००१ ते ०६ या पंचवार्षिकमध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते अशोक मोने यांना श्री. लेवे यांची मोलाची साथ मिळाली होती. तथापि, श्री. लेवे यांनी ‘आताच जबाबदारी नको’ असे सांगत उपाध्यक्षाऐवजी आरोग्य समितीच्या कामात रस असल्याचे आघाडीला कळविले आहे. सहानुभूतीच्या लाटेत अल्लाउद्दीन शेख निवडून आले होते. त्यानंतर आता परत त्यांनी मिळालेल्या संधीचे सोनं केले. सुहास राजेशिर्के यांच्या पत्नी स्नेहल राजेशिर्के याही पाच वर्षे नगरसेविका होत्या. राजेशिर्के कुटुंबाचे राजघराण्याशी जवळचे संबंध आहेत. शुक्रवार पेठेतून मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळवून निवडून आलेले किशोर शिंदे पालिकेच्या कामकाजात नवखे असले तरी या दोन्ही नावांचाही विचार होऊ शकतो.

साताऱ्यातील राजकीय अंधश्रद्धा! 
उपाध्यक्षपदावर काम केलेल्यांचा पालिकेत दीर्घकाळ टिकाव लागत नाही, अशी साताऱ्यात एक राजकीय अंधश्रद्धा आहे. या पदावर काम केलेल्या अनेक अनुभवी व ज्येष्ठ नगरसेवकांना नंतरच्या निवडणुकीत घरी बसावे लागल्याची उदाहरणे बरीच आहेत. त्यातील काहींना मतदारांनी, तर काहींना नेत्यांनी ‘बसवलं’! याच अंधश्रद्धेतून पालिकेतील अनुभवी नगरसेवक उपाध्यक्षपदाची संधी नाकारतात. पालिकेत दुसऱ्या क्रमांकाच्या असलेल्या या पदाने नव्यांना मात्र मोहिनी घातली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com