आजच्या उपनगराध्यक्ष, स्वीकृत निवडी रद्द

आजच्या उपनगराध्यक्ष, स्वीकृत निवडी रद्द

कोल्हापूर - नगरपालिकांतील उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी उद्या (ता. 17) बोलावण्यात आलेली नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक रद्द करण्याचे आदेश आज शासनाने दिले. या निर्णयाने या पदासाठी इच्छुक असलेल्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून, अनिश्‍चित काळासाठी या निवडी पुढे ढकलण्यात आल्याने नगरपालिकांचा कारभारही ठप्प होण्याची भीती आहे.

राज्यातील 192 नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका 27 नोव्हेंबर रोजी झाल्या. यांपैकी 161 नगरपालिकांत नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून झाली. 28 नोव्हेंबर रोजी नगरपालिकांचा निकाल लागला.

त्यानंतर उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी बहुतांशी नगरपालिकांत उद्या (ता. 17) नूतन नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या निवडीचे व सभा बोलावण्याचे अधिकार नगराध्यक्षांना देण्याची घोषणा झाली होती. प्रत्यक्षात हे आदेश कालपर्यंत न निघाल्याने त्या त्या नगरपालिकांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने या निवडीसाठी उद्या बैठक बोलावली होती.

उद्या (ता. 17) या निवडी होणार असल्याने बहुतांशी ठिकाणी कालपासूनच यासाठीच्या राजकीय घडामोडी सुरू होत्या. काही नगरपालिकांत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकही निश्‍चित झाले होते. बहुमतांद्वारे या निवडी होणार असल्याने जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी पाच नगरपालिकांत तर या निवडी एकतर्फीच होणार होत्या. निवड निश्‍चित असल्याने काहींनी उद्या मिरवणुकीची, जल्लोषाची तयारीही केली होती. संभाव्य उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या या आनंदावर आज शासनाच्या आदेशाने पाणी फिरले आहे.

नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडून आल्याने त्यांना काही अधिकार प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिली सर्वसाधारण सभा बोलावण्याचा अधिकार हा जिल्हाधिकारी यांच्याऐवजी थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना मिळणार आहे. यासाठी नगरपालिका अधिनियमात काही बदल करावे लागणार आहेत. हा बदल होईपर्यंत या निवडी होणार नाहीत, असे यासंदर्भात नगर विकास विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. सबब, नगरपालिकांची पहिली सर्वसाधारण सभा पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात यावी असे या आदेशात म्हटले आहे. आदेशावर सहसचिव ज. ना. पाटील यांची सही आहे.

जल्लोषावर फिरले पाणी..
उद्या (ता. 17) या निवडी असल्याने बहुंताशी नगरपालिकात या पदावर कोण हे आज निश्‍चित झाले होते. त्याची औपचारिकता उद्याच्या बैठकीत पूर्ण करण्यात येणार होती. काहींनी गुलाल, मिरवणुकीसह जाहीरातीचे फलकही उभा करण्याचे नियोजन केले होते. पण, शासनाने आज रात्री काढलेल्या एका आदेशाने इच्छुकांच्या या आनंदावर पाणी फिरले.

कार्यभार स्विकारण्याबाबत संभ्रम
राज्यातील बहुंताशी नगरपालिकांतील मावळत्या सभागृहाची मुदत उद्या (ता. 17) संपत आहे. उपनगराध्यक्ष व स्विकृत निवडीची बैठकच रद्द केल्याने नवे नगराध्यक्ष व नगरसेवक यांना कार्यभार स्विकारण्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. उद्या बैठक होईल, त्यात कोणतीही निवड होणार नाही, नवे नगराध्यक्ष व नगरसेवक कार्यभार स्विकारतील असे नगरपालिका प्रशासनातील सुत्रांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com