सव्वासात लाख लोकांना मिळणार विमा कवच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

...येथे होणार उपचार

 • सिव्हिल हॉस्पिटल सातारा
 • श्रीरंग नर्सिंग होम, कोरेगाव
 • ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर, शेंद्रे (ता. सातारा)
 • संजीवन आयसीयू हॉस्पिटल, सातारा
 • शारदा क्‍लिनिक ॲण्ड एरम हॉस्पिटल, कऱ्हाड
 • कोळेकर हॉस्पिटल, कऱ्हाड
 • के. एम. गुजर हॉस्पिटल, कऱ्हाड
 • कृष्णा हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटर, कऱ्हाड
 • सह्याद्री हॉस्पिटल, कऱ्हाड
 • फलटण लाइफ लाइन हॉस्पिटल, फलटण
 • केएमआरएफ निकोप हॉस्पिटल, फलटण
 • घोटवडेकर हॉस्पिटल, वाई
 • बी. जे. काटकर हॉस्पिटल, वडूज
 • सावित्री हॉस्पिटल, लोणंद (ता. खंडाळा)

जिल्ह्यात ६० हजार ई- आरोग्य कार्डचे वितरण
सातारा - सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास एक लाख ५५ हजार ५८७ कुटुंबांतील सुमारे सव्वासात लाख लोकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच मिळणार आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अर्थात आयुष्यमान भारत अंतर्गत जिल्ह्यातील ६० हजार लोकांना ई- कार्डचे वाटप केले आहे. शिवाय, ४९६ आपले सरकार सेवा केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय, १३ खासगी रुग्णालयातही लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत. 

देशात २०११ मध्ये सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणना झाली. त्या आधारावर भूमिहीन, आर्थिक मागास, गरजू लोकांना आरोग्य संरक्षणाचा महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने घेतला आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अर्थात आयुष्यमान भारतअंतर्गत या सुविधा दिल्या जाणार आहेत. महात्मा फुले योजनेचा लाभ सर्वच लोकांना होतो. मात्र, व्यक्तिगत स्वरूपात हा लाभ आहे. तो कुटुंबांनाही मिळेल. शिवाय, या कुटुंबांना अधिकचे आरोग्य संरक्षण देणारी योजना आहे. जिल्ह्यातील एक लाख ५५ हजार कुटुंबांचा या योजनेत समावेश होणार आहे. त्यापैकी सध्या ५९ हजार ६१७ लाभार्थ्यांना ई कार्ड वाटप केले आहे. योजनेच्या माहितीचे पत्र संबंधित लाभार्थ्यांच्या कुटुंबापर्यंत आरोग्य विभागाने पोचविले आहे.

१,५५,५८७ एकूण लाभार्थी कुटुंबे
१,३४,४६० ग्रामीण लाभार्थी कुटुंबे
२१,१२७ शहरी लाभार्थी कुटुंबे

असे मिळवाल ई- कार्ड
लाभार्थी कुटुंबांना पंतप्रधानांचे पत्र घरोघरी दिले आहे. ते पत्र, शिधापत्रिका, आधार कार्ड, पॅनकार्ड अथवा ओळखपत्र घेऊन आपले सरकार सेवाकेंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय अथवा १३ रुग्णालयांत ई- कार्ड मिळवू शकता. सेवा केंद्रामध्ये ३० रुपये शुल्क तर इतरत्र ते मोफत दिले जाते. पत्र गहाळ झाले असल्यास शिधापत्रिका दाखवूनही कार्ड मिळविता येईल, अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: E-Health Card Insurance Security