प्रत्येक चॅनलला १ जानेवारीपासून मोजावे लागणार पैसे

अमरसिंह पाटील
रविवार, 2 डिसेंबर 2018

कळंबा - ‘ट्राय’ने केबल ऑपरेटर आणि डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्यांना दणका दिला आहे. १ जानेवारी २०१९ पासून केबल ग्राहकांना महिन्याला स्थिर आकार भाडे १३० रुपये द्यावे लागणार आहेत. नवीन नियमानुसार ग्राहकांना प्रत्येक चॅनलसाठी कमीत कमी ५० पैशांपासून ते १९ रुपये आणि त्यावर सेवाकर असा बोजा सोसावा लागेल.

कळंबा - ‘ट्राय’ने केबल ऑपरेटर आणि डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्यांना दणका दिला आहे. १ जानेवारी २०१९ पासून केबल ग्राहकांना महिन्याला स्थिर आकार भाडे १३० रुपये द्यावे लागणार आहेत. नवीन नियमानुसार ग्राहकांना प्रत्येक चॅनलसाठी कमीत कमी ५० पैशांपासून ते १९ रुपये आणि त्यावर सेवाकर असा बोजा सोसावा लागेल.

प्रत्येक चॅनलचा दर वेगवेगळा असणार आहे. केबल ऑपरेटरकडून आजपर्यंत महिन्याला २५० ते ४५० रुपयांमध्ये ४५८ पेक्षा जास्त चॅनल्स दाखविले जात आहेत. पण, आता ग्राहकांना १३० रुपयांत १०० चॅनल्सच मोफत दिसतील. त्यातही माहिती नसलेल्या चॅनल्सची संख्या अधिक असेल.प्रत्येक कंपनीच्या वेगवेगळ्या चॅनलचे पॅकेजचे दर वेगवेगळे आहेत. त्यानुसार ही आकारणी होणार आहे. 

महिलांच्या आवडीच्या असलेल्या चॅनल्सचा दर हा वेगवेगळा असेल. अशा किमान १० चॅनल्सचा दर १९० रुपये होईल. प्रत्येक चॅनेलचा दर हा वेगळा असून, त्यावर सेवाकर आकारला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रत्येक महिन्याला केबल पैसे हे वेगवेगळे आदा करावे लागतील. केबलचे महिन्याचे भाडे हे किमान ५०० रुपये असणार आहे.

त्याबरोबरच केबल ऑपरेटरला प्रत्येक घरात कोणते चॅनल दाखविले जात आहेत, याची वेगळी नोंद ठेवावी लागणार आहे. त्याचा हिशेब हा वेगळा ठेवावा लागेल. त्यामुळे केबल ऑपरेटरना पैसे गोळा करण्याबरोबरच प्रत्येक ग्राहकाचा हिशेब ठेवण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करावी लागणार आहे. त्यामुळे आधीच तुटपुंज्या मिळकतीवर चाललेला हा व्यवसाय, त्यातच नवीन नियमांनी या व्यवसायाचे कंबरडेच मोडणार आहे.

आधीच महागाईचा भडका, त्यात केबलचे दर आणखी वाढणार आहेत. वाढणारे दर परवडणारे नसल्याने आवडीचे चॅनल्स पाहण्यावर मर्यादा येणार आणि खिसाही रिकामा होईल.
- योगीराज साखरे,
केबल ग्राहक

आजपर्यंत आम्ही केबल ग्राहकांकडून ठराविक रक्कम घेत होतो. पण, आता नवीन नियमानुसार ग्राहकांकडून प्रत्येक चॅनलचा वेगळा दर आकारण्यात येणार असल्याने आम्हाला आता कारकुनी करण्याची वेळ येणार आहे. ग्राहकही कमी होणार आहेत.
- मुसाभाई कुलकर्णी, 

केबल ऑपरेटर

Web Title: Each channel will have to pay the money from 1 Jan