चर्चा... पैजा... उत्सुकता ; उदयनराजे की श्रीनिवास पाटील

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 October 2019

लोकसभा पोटनिवडणुकीसह जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान झाले आहे. मतमोजणी गुरुवारी (ता. 24) सातारा येथे औद्योगिक वसाहतीत होणार आहे. 

 

सातारा ः लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागणार असल्याने जिल्ह्याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. लोकसभा, विधानसभेला काय होणार, कोणाला किती मते मिळतील, कसा होईल पराभव, कसा होईल विजय, मताधिक्‍य किती मिळेल, यावर गावांतील पारांपासून शहरातील बाजारपेठांपर्यंत याच चर्चा झडत आहे. शिवाय, हौशी कार्यकर्ते पैजा लावत आहेत.
 

लोकसभा पोटनिवडणुकीसह जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान झाले आहे. मतमोजणी गुरुवारी (ता. 24) सातारा येथे औद्योगिक वसाहतीत होणार आहे. अवघे दोन दिवस मतमोजणीस राहिले असल्यामुळे उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने श्रीनिवास पाटील यांच्यासाठी सर्वच ताकद पणाला लावली, तर भाजपने उदयनराजे भोसले यांच्यासाठी जोर लावला. यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. शिवाय, उदयनराजे यांच्या "कॉलर' उडविण्याच्या स्टाईलमुळे आणि श्रीनिवास पाटील यांच्या मिशीमुळे ही लढाई सांकेतिक भाषेत "कॉलर विरुध्द मिशी' अशी बनली आहे. यात कोण जिंकणार, हे राज्याच्या राजकीय वर्तुळातही महत्त्वपूर्ण लढत ठरली आहे.
 
विधानसभा निवडणुकीसाठी कऱ्हाड दक्षिण, माणमध्ये तिरंगी, तर इतरत्र थेट दुरंगी सामना आहे. त्यामुळे सर्वच मतदारसंघांत निकालाबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असल्याने या जिल्ह्यात राष्ट्रवादीची काय अवस्था होणार, यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताकदीवरही चर्चा होणार आहे. परिणामी, लोकसभेसह आठही विधानसभा मतदारसंघांतील निकालाबाबत सर्वत्र चर्चा झडू लागल्या आहेत.
 
दोन्ही उमेदवारांचे समर्थक कार्यकर्ते तर आपल्याच उमेदवाराचा विजय होणार, यातून पैजा लावू लागले आहेत. त्यामुळे जेवणासह दिवाळीसाठी भेटवस्तू देणे यापर्यंत पैजा लावल्या जात आहेत. मात्र, कार्यकर्ते, सर्वसामान्यांकडून वेगवेगळ्या चर्चा ऐकण्यास मिळत असल्याने पैजा लावणाऱ्यांचे धाबेही दणाणू लागले आहेत. शिवाय, उमेदवारही कोणत्या मतदारसंघात, गावात, गटांत, शहरातील किती मते मिळणार, याचे अंदाज बांधण्यात व्यस्त आहेत. 

आकडेमोडीचा खेळ 

उमेदवारांच्या स्तरावर लोकसभा आणि विधानसभानिहाय मताधिक्‍याचा आकडेमोडीचा खेळ सुरू आहे. लोकसभेच्या दृष्टीने अमूक मतदारसंघात या उमेदवाराचा आपल्याला फायदा होईल, कऱ्हाड उत्तर, दक्षिणमधील "कपबक्षी' आपल्या पथ्यावर पडेल, अशा जमा, वजाबाकींची आकडेमोड सुरू आहे. त्यातून कोण घासून येणार, कोण ठासून येणार, याबाबतही तर्कवितर्क लढविले जात आहेत. निकालाची हवा चांगलीच तापली असून, निकालानंतरच हे वातावरण शांत होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eagerness about Lok Sabha and Assembly results in maharashtra