लग्नसमारंभात पर्यावरण संवर्धनाचा जागर; नवदाम्पत्याच्या हस्ते नातेवाइकांना वाटले डस्टबीन

परशुराम कोकणे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

समाजकार्य किंवा आपल्या हातून चांगले कार्य करण्यासाठी वेळ, काळ पाहावा लागत नाही याची प्रचिती पूर्व भागातील एका लग्नसमारंभात आली. नवदाम्पत्याने पर्यावरण संवर्धनाचा जागर करत स्मार्ट सिटीसाठी काम करणाऱ्या 'मिटकॉन'च्या माध्यमातून डस्टबीनचे वाटप करण्यात आले. 

सोलापूर : पर्यावरण संवर्धनाचे सामाजिक कार्य आपल्या हातून घडावे अशी सर्वांचीच इच्छा असते, पण सुरवात कोठून आणि कधी करावी, असा प्रश्‍न सर्वांनाच पडतो. समाजकार्य किंवा आपल्या हातून चांगले कार्य करण्यासाठी वेळ, काळ पाहावा लागत नाही याची प्रचिती पूर्व भागातील एका लग्नसमारंभात आली. नवदाम्पत्याने पर्यावरण संवर्धनाचा जागर करत स्मार्ट सिटीसाठी काम करणाऱ्या 'मिटकॉन'च्या माध्यमातून डस्टबीनचे वाटप करण्यात आले. 

राजेश बोलाबत्तीन आणि ऐश्‍वर्या यांचा विवाह काल (शनिवारी) सायंकाळी दत्तनगर परिसरात परिसरात झाला. लग्न मंडपामध्ये मंगलाष्टका झाल्यानंतर जोडप्याने जमलेल्या नागरिकांना प्लास्टिकचा वापर करू नका, प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावून त्याचे आपल्या मुलाप्रमाणे संगोपन करावे तसेच ओला आणि सुका कचरा घरच्या घरीच वेगवेगळा जमा करून नियमित येणाऱ्या घंटागाडीमध्ये देण्याचे आवाहन केले.

सोलापूर महानगरपालिकेतर्फे देण्यात येत असलेले हिरवा आणि निळा, असे दोन डस्टबीन याप्रमाणे 25 नातेवाइकांना नवदाम्पत्याच्या हस्ते डस्टबीनचे वाटपही करण्यात आले. डस्टबीनसाठी आवश्‍यक असणाऱ्या टॅक्‍स पावत्या जमा करून मिटकॉनच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आनंद बिरू, मिटकॉनचे अधिकारी संजय हिरेमठ, भाऊराव भोसले, अमर कांबळे, पर्यावरणप्रेमी अॅड. धनंजय येमुल, सतीश मुदगुंडी, नरेश बोलाबत्तीन आदी उपस्थित होते. 

इको फ्रेंडली क्‍लबचे सदस्य सतीश मुदगुंडी यांनी केलेल्या पर्यावरणपूरक लग्न समारंभातून प्रेरणा घेऊन बोलाबत्तीन कुटुंबीयांनी इको फ्रेंडली लग्नपत्रिका छापली होती. लग्नपत्रिका 12 तास पाण्यात भिजवून ती झाडाच्या बीप्रमाणे मातीत लावल्यानंतर त्यातून तुळशीचे रोप येईल, अशी इको फ्रेंडली लग्नपत्रिका सर्वांनाच आवडली आहे.

Web Title: eco friendly arrangements in marriage at solapur