पर्यावरणपूरक गणेशोत्सव कागदावरच; लगद्यांच्या मूर्तींची मागणी घटली

शैलेश पेटकर
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

दोन वर्षांपूर्वी तब्बल तीन हजार कागदी लगद्याच्या मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. त्यापैकी हजारहून अधिक मूर्ती शिल्लक राहिल्या, त्या गतवर्षी देण्यात आल्या. परंतू त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता यंदा या मूर्तीची मागणीच घटली आहे.

सांगली - गणेशोत्सवाला पर्यावरणपूरकतेची जोड देण्याचा प्रयत्न निसर्गप्रेमींकडून सुरू आहे. मात्र गणेशभक्तांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सव 'कागदा'वरच राहू लागल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी तब्बल तीन हजार कागदी लगद्याच्या मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. त्यापैकी हजारहून अधिक मूर्ती शिल्लक राहिल्या, त्या गतवर्षी देण्यात आल्या. परंतू त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता यंदा या मूर्तीची मागणीच घटली आहे. काही मोजक्‍याच मुर्ती बनवल्या जाणार आहेत. दुसऱ्या बाजूला शाडूच्या मुर्तींचे उत्पादनही कमी असल्याचे चित्र आहे. एकूण पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज आहे. 

घरोघरी गणेशाची आतुरतेने गणेशभक्त वाट पाहत आहेत. सार्वजनिक मंडळांचे जंगी नियोजन सुरू आहे. पण या साऱ्यात गणेशभक्त पर्यावरणाला विसरून चालले आहेत की काय, असा प्रश्‍न पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित होतोय. दरवर्षी हजारो टन प्लास्टर, रासायनिक रंग, निर्माल्य पाण्यात मिसळून प्रदूषणात भर पडते आहे. यासाठी निसर्गप्रेमींनी 'इको फ्रेंडली' गणेशोत्सवाचा जागर केला. परंतु त्याला पाहिजे तितका प्रतिसाद मिळेना झालाय. आभाळमाया फाउंडेशन, लुल्ला चॅरिटेबल ट्रस्टने आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, गणेशभक्तांचा अल्पप्रतिसाद मिळतो आहे. 

  •  मूर्तीकारांचा पुढाकार हवा..! 

मूळात प्लास्टरच्या मूर्तीपेक्षा अधिक दणकट आणि पर्यावरणपूरक असणाऱ्या कागदी लगद्याच्या गणेशमूर्तीच्या निर्मितीचा उपक्रम गेल्या चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात सुरू झाला. दरवर्षी दोन-तीन हजार मुर्ती बनवल्या जात होत्या. या मूर्ती दिसायला आकर्षक नसल्याने आणि त्याबाबतचा गैरसमज असल्याने त्यांची विक्री घटली आहे. तसेच प्लास्टरच्या मूर्तीपेक्षा अधिक वेळही लागत असल्याने त्यासाठी मूर्तिकारांचा पुढाकारही नसतो. सांगलीवाडीतील दर्शन आर्टचे मूर्तिकार प्रदीप कुंभार यांनी त्याचा पुढाकार घेऊन उपक्रम जपला आहे. मात्र प्रतिसाद कमी मिळत असल्याने ओढा कमी आहे. यंदा त्यांच्याकडे एकही मुर्ती बनवली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

  • कागदी मुर्ती होते कशी? 

पर्यावरणपूरक मूर्ती तयार करताना रद्दी पेपर, इतर कागद पाण्यात भिजवून ते मिक्‍सरमधून काढून एकजीव लगदा केला जातो. खायचा डिंक, शाबूची खळ आणि व्हायटिंग मिक्‍स केली जाते. त्यानंतर साच्यातून 24 तासांनी छानशी मूर्ती तयार होते. तिला नैसर्गिक रंग (वॉटर बेस्डच) दिले जातात. विशेष बाब म्हणजे या कागदाच्या मूर्ती विसर्जन केल्यानंतर विरघळतात. विरघळलेल्या मूर्तीचे पदार्थ माशांना अन्न म्हणून उपयुक्त होतात. त्यामुळे पर्यावर होत नाही, अशी माहिती मूर्तिकार प्रदीप कुंभार यांनी दिली. 

"पर्यावरपूरक गणेशोत्सवासाठी प्रथम प्लास्टरला बंदी घालणे गरजेचे आहे. आभाळमाया फौंडेशनतर्फे गेल्या पाच वर्षांपासून पर्यावरणपूरक मुर्तींसाठी प्रबोधन केले जाते. कागदी लगद्यांच्यामुर्तींना मागणी घटली असली तरी शाडूच्या मुर्तींना मागणी आहे. त्यासाठी फौंडेशनतर्फे पुढाकार घेवून त्या मुर्तीची विक्री केली जाणार आहे. पर्यावरणासाठी माफक दरात शाडूच्या मुर्तीसाठी दिली जाणार आहे.''  - प्रमोद चौगुले, संस्थापक अभाळमाया फाउंडेशन. 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Eco friendly Ganesh Festival remains only on paper