इको फ्रेंडली आकाशकंदीलही दाखल

Diwali
Diwali

सातारा - दिवाळीत दीव्यांनी दिशा दीपविण्यासाठी पारंपरिक मातीच्या पणत्यांसह रंगीबेरंगी, चकचकीत कागदांच्या अन्‌ विविध आकारातील आकाशकंदिलांनी बाजारपेठ भरून गेली आहे. यावेळी साध्या कागदाचे कळकाच्या काड्यांपासून केलेले तसेच कापडी इको फ्रेंडली आकाशकंदीलही विक्रीसाठी आले आहेत. 

दिवाळी हा दिव्यांचा सण. अंधाराला बाजूला सारून आनंदाच्या प्रकाशात न्हाऊन निघण्यासाठी गुजरात, कोलकात्यातील आकर्षक पणत्या साताऱ्यात दाखल झाल्या आहेत. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने विक्रेत्यांनी आतापासूनच दुकाने मांडली आहेत. लखलखणाऱ्या आकाशकंदिलांच्या प्रकाशाने बाजारपेठ लखलखून जात आहे. नेहमीच्या पारंपरिक पणत्या अधिक नक्षीदार होऊन बाजारात दाखल झाल्या आहेत. पारंपरिक कुंभारी पणत्या मात्र अभावानेच बाजारात आढळतात. मातीच्या पणत्यांबरोबरच मेणापासून बनलेल्या व पाण्यात तरंगू शकणाऱ्या वेगळ्या ‘फ्लोटिंग कॅण्डल्स’ पणत्या नागरिकांना आकर्षित करत आहेत. या पणत्या सूर्यफूल, जास्वंदी, शेवंती, अश्‍टर, गुलाब आदी वेगवेगळ्या फुलांच्या आकारांत उपलब्ध आहेत. ग्राहक दरवर्षी नवीन डिझाइन्सच्या आणि आकर्षक पणत्यांची मागणी करीत असतो. त्यामुळे वेगळ्या प्रकारच्या पणत्या पाहावयास मिळतात. 

मातीच्या, चिनी मातीच्या, टेराकोटा माती, तसेच इतर डेकोरेटिव्ह पणत्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. मोर, बदक, हंस, शंख आशा कलाकुसर केलेल्या चिनी मातीच्या पणत्या सहाजिकच ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय लालटेन, लामणदिवे, पंचारती, उभ्या पणत्या, दीपस्तंभ, टांगते दिवे, पंचारती, गणपतीच्या-नारळाच्या आकाराच्या पणत्याही येथे आल्या आहेत. त्याच्या किमती मात्र आकाराप्रमाणे शंभर रुपयांच्या पुढे आहेत. छोट्या पणत्या ३० ते ६० रुपये डझन विकल्या जात आहेत. आकाशकंदिलावर चिनी पद्धतीच्या आकारांची छाप आहे. प्लॅस्टिक बंदीमुळे कापडी, साध्या कागदाचे आकाशकंदीलही उपलब्ध झाले आहेत. 

पारंपरिक आकाशकंदीलही विक्रीस
पूर्वी आकाशकंदील घरोघरी तयार केले जात. कळकाच्या कांब्या आणून त्या विशिष्ट आकारात बांधून तयार झालेल्या चौकानांना चिरमुरी कागद बेलफळातील डिंकाने चिटकविले जात. या कंदीलाला तळाशी पणती ठेवण्यासाठी जागा केली जायची. तसेच खाली कागदी झिरमुळ्या सोडल्या जायच्या. दारात उंच कळक बांधून वरच्या टोकाशी आकाशकंदील अडकविला जायचा. आता एवढे परिश्रम कोणी घेत नाही. मात्र, असे इको फ्रेंडली आकाशकंदीलही बाजारात उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com