अत्याचार पीडित महिलांना ‘आर्थिक’ आधार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

मनोधैर्य योजनेतून मदत; सहा महिन्यांत ४२ महिलांना ७४ लाखांचे अर्थसाह्य
सातारा - बलात्कार, अत्याचार पीडित महिलांना मानसिक व आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेतून गेल्या सहा महिन्यांत ४२ महिलांना ७४ लाखांचे अर्थसाह्य देण्यात आले आहे. जिल्ह्याला वर्षभरात या योजनेसाठी साधारण एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होतो.  

मनोधैर्य योजनेतून मदत; सहा महिन्यांत ४२ महिलांना ७४ लाखांचे अर्थसाह्य
सातारा - बलात्कार, अत्याचार पीडित महिलांना मानसिक व आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेतून गेल्या सहा महिन्यांत ४२ महिलांना ७४ लाखांचे अर्थसाह्य देण्यात आले आहे. जिल्ह्याला वर्षभरात या योजनेसाठी साधारण एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होतो.  

लैंगिक अत्याचारग्रस्त मुली, मुले व ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्यांना तत्काळ अर्थसाह्य करण्याबाबत योजना सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते. त्यानंतर राज्य शासनाने अत्याचार पीडितांसाठी ऑक्‍टोबर २०१३ पासून मनोधैर्य योजना सुरू केली. जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाद्वारे ही योजना राबविण्यात येते. परंतु, निधी थेट मंजूर करण्याचा अधिकार या विभागाला नाही. हा विभाग प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा मंडळाकडे पाठवतो. जिल्हा मंडळाच्या निर्णयानंतर ही मदत संबंधित पीडिताला दिली जाते.  

यात मध्यंतरी काही प्रकरणात अडचणी निर्माण झाल्याने निधी वाटपात विलंब झाला होता. पण, यावर्षी जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडून निधी वाटप होऊ लागले आहे. पीडिताला तत्काळ अर्थसाह्य मिळावे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. साधारण वर्षभरात शंभरच्या आसपास प्रकरणे दाखल होतात. त्यापैकी जिल्हा मंडळाकडून मान्यता मिळालेल्या प्रकरणांनाच मदतीचे वाटप होते. या मंडळाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून मंडळाची बैठक होऊन त्यामध्ये अशा प्रकरणावर निर्णय घेतला जातो. त्यातून संबंधितांना मदत वाटप होते. यामध्ये अशा प्रकरणाची एफआयआर दाखल झाल्यावर ५० टक्के व उर्वरित रक्कम ही दोषारोपपत्र दाखल झाल्यावर दिली जाते. 

काय आहे मनोधैर्य योजना
अत्याचार पीडित महिला, मुले, मुलींना किंवा त्यांच्या वारसांना उपचार, कायदेशीर बाबी, शिक्षण, मानसोपचारांची मदत घेण्याकरिता त्वरित आर्थिक साह्य मिळते. बलात्कार, बालकावरील लैंगिक अत्याचारप्रकरणी किमान दोन लाख, तर विशेष प्रकरणात तीन लाखांची मदत देण्यात येते. ॲसिड हल्ल्यात जखमी महिला व बालकास चेहरा विद्रूप झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास तीन लाख रुपये अर्थसाह्य देण्यात येते. त्यामध्ये पोलिस ठाण्यात प्रथम माहिती तक्रार (एफआयआर) दाखल झाल्यावर ५० टक्के व दोषारोपपत्र दाखल झाल्यावर ५० टक्के अशी दोन टप्प्यांत ही मदत दिली जाते. 

Web Title: economic support to torture victim women