नोटाबंदीवर अर्थतज्ज्ञ डॉ. जाखोटिया म्हणाले....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

- काळे धन पैशांमध्ये नसते तर हिरे, माणिक व रियल इस्टेटमध्ये असते
- नोटाबंदीमुळे कोसळले अर्थकारणाचे तीन स्तंभ
- आर्थिक विकासासाठी आहे सामुहिक प्रयत्नांची गरज
- शेती, सेवा व उत्पादनावर नोटाबंदीचा परिणाम

सोलापूर : सरकारने नोटाबंदीची पुरेशी तयारी न केल्याने दर आठ दिवसांनी नोटाबंदीचा उद्देश बदलावा लागला. काळा पैसा हा कधीच नोटांमध्ये ठेवला जात नाही. तर काळे धन हे हिरे, माणिक, रियल इस्टेटमध्ये लपविले जाते. नोटाबंदीमुळे बाजारात नाणे फिरले नाहीत. त्याचा शेवटच्या अर्थकारणावर झाला आणि शेती, सेवा व उत्पादन हे अर्थकारणाचे तीन प्रमुख स्तंभ डबघाईला आले, अशी टिका अर्थतज्ज्ञ डॉ. गिरीश जाखोटिया यांनी केली. आता आर्थिक विकासासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

हेही आवर्जुन वाचा अबब...729 पदांसाठी सव्वातीन लाख उमेदवार

शिवस्मारक येथे भारती विद्यापीठ अभिजीत कदम इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड सोशल सायन्सेस व चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित भारतातील आर्थिक मंदी व जागतिक परिस्थिती या विषयावर शनिवारी (ता. 30) डॉ. जाखोटिया बोलत होते. या वेळी इन्स्टीट्युटचे संचालक डॉ. व्ही. एस. मंगनाळे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, सचिव धवल शहा, डॉ. ए. बी. नदाफ, डॉ. एम. के. पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. व्ही. एस. मंगनाळे यांनी केले तर पाहुण्यांची ओळख डॉ. पी. पी. कोठारी यांनी करुन दिली.
डॉ. गिरीश जाखोटिया म्हणाले, भारतातील नागरिकांमध्ये जाती-धर्माचा भेदभाव, अहंकार आणि एकमेकांवरील अविश्‍वास दिसून येतो. त्यामुळे एकी दिसत नाही. मात्र, सामुहिक प्रयत्नाशिवाय मंदीतून ठोस मार्ग सापडणार नाही. सामुहिक शेतीतून शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. बाजार समित्या बंद करुन दुकानदारांनी एकत्रित येऊन थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करावा आणि ग्राहकांपर्यंत पोहचवावा, असेही त्यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राहुल मांजरे यांनी केले तर आभार श्री. राठी यांनी मानले.

हेही आवर्जुन वाचा खुषखबर...! या शहरात येणार 100 कृषी हवामान शास्त्रज्ञ

डॉ. जाखोटिया म्हणाले...
- स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजीवणीची देशाला गरज
- मागणी व पुरवठा यातील संतुलन बिघडले असून ते ठिक करण्याचे प्रयत्न व्हावेत
- सात हजारांवर काम करणाऱ्या अभियंत्यांची संख्या देशात मोठी
- सोलापुरसह मोठ्या शहरांमधील जागांचे दर कमी होऊ लागले आहेत
- भारतीयांकडील एक टक्‍का सोने सरकारला विनाव्याज दिले तर 10 लाख कोटी रुपयांची उभारणी होईल
- आरबीआयने कपात केलेल्या व्याजाचा लाभ छोट्या व्यावसायिकांना मिळालाच नाही
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Economist Dr Nota Ban. Zakhotia said….