देशाच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेवर यशवंत सिन्हा म्हणाले...

देशाच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेवर यशवंत सिन्हा म्हणाले...

कोल्हापूर - देशाची आर्थिक व्यवस्था अतिशय गंभीर आहे. नोटबंदी आणि जीएसटीपासून याची सुरवात झाली आहे. याला अर्थमंत्री जबाबदार नाहीत. या सरकारचे सर्व निर्णय पंतप्रधान कार्यालयातून होत असल्याने ही जबाबदारी पंतप्रधानांची आहे. आत्ताच योग्य पावले उचलली तरच भविष्यातील तीन वर्षात आर्थिक घडी व्यवस्थित बसेल. अन्यथा वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट मत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

कराड येथे असलेल्या एका कार्यक्रमानिमित्त ते पहिल्यांदाच कोल्हापुरात आले होते. कोणतेही राजकीय व्यासपीठ या पत्रकार परिषदेस नसल्याचा खुलासा करून देशाची आर्थिक व्यवस्था या विषयावर मत मांडले.

श्री. सिन्हा म्हणाले, आजपर्यंत देशात अनेक वेळा अर्थव्यवस्था कोलमडली. निर्णय योग्य घेतल्याने अर्थव्यवस्था सुधारली. पुढे विकासाचा दर पाचवर्षे आठ टक्‍क्‍यापर्यंत राहीला. नोटबंदीने कृषी, ग्रामीण आणि औद्योगिक क्षेत्रातील अर्थव्यवस्था धोक्‍यात आली. नंतर जीएसटीने भर घातली. पूर्वी प्रत्येक वर्षी 30 लाख नवीन रोजगार निर्मिती होत होती. गेल्या सहा वर्षात ती वर्षाला एक लाखांवर आली. सरकारकडून दाखविली जाणारी आकडेवारी मानव निर्मित छेडछाड केलेली फसवी आहे ज्याप्रमाणे साहेबाला खुश ठेवणारे निर्णय कर्मचारी घेतात त्याचप्रमाणे ही अवस्था अर्थमंत्र्यांची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

दोन हजाराच्या नोटांची छपाई बंद केल्याबाबत ते म्हणाले,"" बड्या आणि काळेधंदे वाल्यांसाठी घेतलेला हा निर्णय होता. जास्तीत जास्त पैसे सहज कसे घेऊन जाता येतील हा उद्देश होता. दोन हजाराच्या नोटांमधून जितका पैसा मुरवायचा होता तो मुरला आहे. त्यामुळे आता छपाई बंद केली आहे. आर्थिक घडी बसवण्यासाठी अर्थमंत्र्यांनी कर कमी केले, मात्र त्याचा फायदा बड्या कंपन्यांनाच झाला. असले निर्णयच धोकादायच ठरत आहेत.'' 

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काय करावे लागेल. यावर ते म्हणाले,"" गुंतवणूक, उत्पादन आणि निर्यात ही त्रिसूत्री अवलंबणे आवश्‍यक आहे. रेल्वे, रस्ते, मोबाईल, कृषी, गृहनिर्माण अशा ठिकाणी गुंतवणूक केल्यास रोजगार वाढतो, मागणी वाढते, यातून उत्पादन वाढते असे झाल्यास पुन्हा अर्थव्यवस्था सुरळीत होऊ शकते. कच्च्या तेलाच्या बॅरलचा दर 110 होता. तो 30 पर्यंत खाली आला याचा फायदा घ्यायला हवा होता. आता तो साठवर पोहोचला आहे. तो पुन्हा 110 होण्यापूर्वी योग्य ती पावले उचलली तरच भविष्यातील तीन वर्षात अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल. अन्यथा खूपच वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागेल. 

तज्ज्ञांचे इशारे 
नोबेल पारितोषिक विजेता अभिजीत बॅनर्जी, रघुराम राजन, सुब्रमण्यम यांनी इशारे देवून सुद्धा ऐकले जात नाही. त्याचे परिणाम भोगावे लागतात. कृषी व्यवसाय आणि छोट्या उद्योगापर्यंत त्याचे परिणाम होतात. सर्वसामान्य जनतेला हे भोगावे लागते. अर्थशास्त्रमध्ये कोणतीही चूक शिक्षेस पात्र ठऱते. तुम्ही जसे निर्णय घ्याल, तसे "रिझल्ट' तुम्हाला मिळतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com