शिक्षण विभागच झाला अधू

दौलत झावरे
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

इमारतीचा पाया कच्चा झाला, तर ती इमारत जमीनदोस्त झाल्याशिवाय राहत नाही. तसेच चांगली पिढी घडवायची असेल, तर शिक्षणाचा पाया भक्कम असणे गरजेचे आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत.

नगरः इमारतीचा पाया कच्चा झाला, तर ती इमारत जमीनदोस्त झाल्याशिवाय राहत नाही. तसेच चांगली पिढी घडवायची असेल, तर शिक्षणाचा पाया भक्कम असणे गरजेचे आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवर होत आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकसंख्या कमी आहे, तर बहुतांशी ठिकाणी दीर्घ रजेवर गेलेल्यांना बदली शिक्षकही दिलेला नाही. 
शिक्षणाचे शिक्षण विभाग संचलन करतो. मात्र, तेथे काम करण्याची अनेकांची मानसिकता नाही. एकंदर या विभागाचा गाडा रडतखडत चालला आहे. 

प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांबरोबर बसून ती करून घ्यावी लागत आहे. ही परिस्थिती मुख्यालयातच नव्हे, तर तालुक्‍याच्या ठिकाणी आहे. परंतु तालुक्‍याच्या ठिकाणावरून आलेल्या माहितीवर मुख्यालयात कामकाज होत असते. त्यामुळे मुख्यालयात प्रशिक्षित व पूर्ण पदे भरलेली असणे गरजेचे आहे. मात्र, मुख्यालयातच कमी कर्मचारी व अप्रशिक्षित असलेल्या काही कर्मचाऱ्यांमुळे अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. 

शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी आदी पदे रिक्त आहेत. कमी अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे गुणवत्तावाढीसाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. नवीन उपक्रम राबविण्यात अडचणी येत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख वाढवावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे. मात्र, प्रशिक्षित व कमी असलेले संख्याबळ कोठून आणायचे, असा प्रश्‍न आता सर्वांनाच पडला आहे. त्यात माहिती अधिकारात मागविलेल्या अर्जांची भर पडत आहे. 

पोषणआहार वाऱ्यावर 

विद्यार्थ्यांना शालेय पोषणआहारावर नियंत्रणासाठी अधीक्षकांचे पद प्रत्येक तालुक्‍याला मंजूर केले आहे. जिल्ह्यात 13 पदे मंजूर असताना फक्त तीनजण कार्यरत आहेत. एकूण 10 पदे रिक्त आहेत. 

शिक्षण नको रे बाबा 

शिक्षण विभागात कामे जास्त व कर्मचारी कमी असल्यामुळे अनेक जण शिक्षण विभागात नोकरी नको रे बाबा म्हणून बदलीच्या वेळी शिक्षण विभागाला फाटा देऊन इतर विभागात जागा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. 

मंजूर पदे व कंसात रिक्त पदे 

उपशिक्षणाधिकारी ः दोन (एक), वरिष्ठ सहायक लेखा ः दोन (दोन), वरिष्ठ सहायक ः अकरा (चार), कनिष्ठ सहायक ः 29 (चार), गटशिक्षणाधिकारी ः 14 (पाच), शालेय पोषण आहार अधीक्षक ः 13 (दहा), मुख्याध्यापक ः 480 (125), केंद्रप्रमुख ः 246 (120), विस्तार अधिकारी ः 82 (27), उपाध्यापक (मराठी माध्यम) ः 10005 (86), उर्दू माध्यम 205 (29), पदवीधर (मराठी माध्यम) ः 1080 (62), उर्दू माध्यम ः 91 (24).  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The education department has become incomplete