अंड्याचा दर वाढला; मात्र उत्पन्न घटले, मोठा आर्थिक फटका : राज्यातील स्थिती

दिलीप कोळी
Friday, 18 September 2020

कोरोनाने डबघाईला आलेल्या पोल्ट्री व्यवसायाला आता 'अच्छे दिन' आलेत. प्रति अंडे साडेपाच रुपये पोल्ट्रीधारकांना मिळत आहेत. आता अंड्याला दर मिळत असला तरी कोरोनामुळे चाळीस टक्के पोल्ट्री व्यवसाय बंद पडला आहे.

विटा : कोरोनाच्या धास्तीने अंडी, चिकन, मटण खाण्याकडे लोकांनी पाठ फिरवली होती. आता आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अंडी, चिकन व मटणाला मागणी वाढली आहे. कोरोनाने डबघाईला आलेल्या पोल्ट्री व्यवसायाला आता 'अच्छे दिन' आलेत. प्रति अंडे साडेपाच रुपये पोल्ट्रीधारकांना मिळत आहेत. आता अंड्याला दर मिळत असला तरी कोरोनामुळे चाळीस टक्के पोल्ट्री व्यवसाय बंद पडला आहे.

राज्यात अडीच कोटी अंड्यावरील कोंबड्या होत्या. त्या आता दीड लाख राहिल्या आहेत. त्यामुळे पोल्ट्रीधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 
कोंबड्याचे खाद्य तयार करण्यासाठी मका आवश्‍यक घटक आहे. फेब्रुवारी 2019 पासून मका पिकावर अमेरिकन अळीने हल्ला केला होता. त्यात साठ टक्के मक्‍याचे उत्पन्न घटले. परिणामी मक्‍याचा साठा करून ठेवलेल्या व्यापा-यांनी 28 ते 29 रुपये किलोने मका विक्री केली. त्याचा फटका पोल्ट्रीधारकांना बसला. मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. त्यामुळे परराज्यातून कोंबड्यांचे खाद्य तयार करण्यासाठी येणा-या कच्च्या मालाच्या वाहतूकीला अडथळा येऊ लागला. त्यामुळे कोंबड्यांना खाद्य घालणे पोल्ट्रीधारकांना मुश्‍किल झाले.

परिणामी चाळीस टक्के व्यवसायिकांनी जेसीबीने खड्डे काढून अंडी व कोंबड्या, लहान पिल्ली पुरून टाकली. आता अंड्याला चांगला दर मिळू लागला आहे. मात्र व्यवसाय बंद केलेल्या पोल्ट्रीधारकांची आता व्यवसाय उभारण्याची आर्थिक परिस्थिती नाही. सध्या अंड्याचे उत्पन्न कमी झाल्याने अंड्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. पोल्ट्रीधारकांकडून किराणा दुकानदार प्रति अंडे साडेपाच रूपयांना खरेदी करून सहा ते सात रूपयांनी अंड्याची विक्री करत आहेत. मात्र अंड्याचे उत्पन्न घेणा-या पोल्ट्रीधारकांना साडेपाच रूपयांवर समाधान मानवे लागत आहे. अंड्याबरोबर चिकन, बोकडाच्या मटणालाही मागणी वाढली आहे. चिकन प्रतिकिलो दोनशे तर बोकडाच्या मटणाला सहाशे रूपये दराने सध्या जोमात विक्री सुरू आहे. 

पोल्ट्रीधारकांना मदत करा
पोल्ट्रीधारकांनी आंदोलने, निवेदने, विनंत्या, पाठपुरावा करून, मंत्र्याबरोबर बैठका घेऊनही शासनाने कसलीही आर्थिक मदत केली नाही. पोल्ट्रीधारकांकडून साडेपाच रूपयाने अंडी खरेदी करून ग्राहकांना सहा ते सात रूपये विक्री केली जात आहे ही तफावत थांबली पाहिजे. पोल्ट्रीधारकाला हातात सहा ते साडेसहा रूपये हातात मिळाले तरच कोरोनामुळे झालेले नुकसान भरून निघेल. व व्यवसायाला उभारी मिळेल. शासनाकडे आम्ही प्रति कोंबडी दीडशे रूपयांप्रमाणे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. त्याचा शासनाने विचार करून पोल्ट्रीधारकांना मदत करावी. 
- शत्रुघ्न जाधव, पोल्ट्री व्यावसायिकांचे नेते 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Egg prices increased; but production fell, a big financial blow: the situation in the state