चांदोली परिसरात पंधरा वर्षांत आठ बिबट्यांचा मृत्यू

शिवाजीराव चौगुले
सोमवार, 20 मे 2019

सांगली - सन २००४ पासून आतापर्यंत चांदोली राष्ट्रीय अभयारण्य पट्ट्यातील आठ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील काही बिबट्यांचा विषबाधेने संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी (ता. १७) शेडगेवाडीत जलसेतूवरून पडून आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला.

सांगली - सन २००४ पासून आतापर्यंत चांदोली राष्ट्रीय अभयारण्य पट्ट्यातील आठ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील काही बिबट्यांचा विषबाधेने संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी (ता. १७) शेडगेवाडीत जलसेतूवरून पडून आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. चांदोलीचे वैभव असलेल्या बिबट्याचा माणसाशी संघर्ष सतत होत आला आहे; मात्र अनैसर्गिक कारणाने होत असलेले मृत्यू त्याच्या कारणांपर्यंत पोचले पाहिजे, याचे संकेत देणारे आहेत.  

मागील आठवड्यात चांदोली परिसरात दोन घटना घडल्या. पहिली घटना होती, चांदोलीच्या जंगलात अर्थात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एक पथक वन्यजीवांची गणना करण्यासाठी दाखल झाले होते. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्यजीव गणना करण्याची परंपराच आहे. मात्र, तत्पूर्वी शेडगेवाडीत जलसेतूवरून पडून एका बिबट्याचा मृत्यू झाला. या जंगलात बिबट्यांची संख्या किती? हे यशावकाश कळेल. त्यात चार-दोन कमी जास्त असतीलच. मात्र, गेल्या १५ वर्षांत काही ना काही अपघाताने तब्बल आठ बिबट्या गमवावे लागणे, हे चांदोलीसाठी चांगले लक्षण नक्कीच नाही.

बिबट्या मृत्युमुखी पडल्याच्या आठपैकी सात घटना शिराळा आणि एक घटना वाळवा तालुक्‍यात झाली. पैकी उद्यानात असताना दोन, तर उद्यानाबाहेर सहा बिबट्यांचा मृत्यू झाला. चांदोली राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची संख्या तुलनेत अधिक आहे. त्यातील काही बिबटे अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. अनेकदा रस्ता भरकटतात. बाहेरच फिरत राहतात. त्यांचा वावर चांदोली राष्ट्रीय उद्यानापासून ६० कि.मी. अंतरापर्यंत आहे.

काहीवेळा पुरेसे अन्न मिळत नसल्याने बिबटे आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवतात. मांगरूळ, बिळाशी, वाकुर्डे, येळापूर, कुसाईवाडी, मांगले, मिरखेवाडी, बेरडेवाडी परिसरात बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले आहे. आठवड्यापूर्वी बिळाशी येथे एकावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. 

शुक्रवारी शेडगेवाडी-खुजगाव दरम्यान असलेल्या वारणा जलसेतूवरून पडून बिबट्याचा मृत्यू झाला. त्यावेळी त्या परिसरात असणाऱ्या युवकांमुळे घटना तत्काळ समजली. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण समजण्यास मदत झाल्याचे सांगितले जाते. याआधीच्या नोंदीनुसार, १४ सप्टेंबर २००४ रोजी खेड तालुक्‍यातील आयनीमेटा येथून चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यासाठी आणलेल्या बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यापूर्वी चव्हाणवाडी येथील जंगलात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. 

सन २०१६ ला वाकाईवाडी येथे दोन, तर वाकुर्डे खुर्द येथील सवादकरवाडी येथील शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. १ जानेवारी २०१५ ला कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीत धुमाकूळ घातलेला बिबट्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यासाठी नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. तीन महिन्यांपूर्वी येडेनिपाणी येथे बिबट्या मृतावस्थेत 
सापडला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight Leopard dead in 15 years in Chandoli region