पोळवर आणखी आठ खुनांचा संशय

पोळवर आणखी आठ खुनांचा संशय

सात बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाइकांचे तपासासाठी पोलिसांना साकडे
वाई - अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्य अध्यक्षा मंगल जेधे खून प्रकरणातील आरोपी कथित डॉ. संतोष पोळकडून आपल्या बेपत्ता नातेवाइकांचा घातपात झाला असल्याचा संशय आज वाई परिसरातील आठ जणांनी पोलिसांकडे व्यक्त केला. त्या अनुषंगाने तपासाचे आश्‍वासन पोलिसांनी नातेवाइकांना दिले आहे. त्यामुळे पोळच्या गुन्ह्यांची व्याप्ती वाढणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान, वनिता गायकवाड यांच्या मृतदेहाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पोळला आज उंब्रज पोलिस ठाण्यात नेले होते.

दीपाली कृष्णा सणस (वय 20, रेणावळे, ता. वाई), विलास विष्णू ढगे (रा. रविवार पेठ, वाई), महादेव सोनू चिकणे (वय 42, रा. वडवली, ता. वाई), शैलेश भगवान गोवंडे (वय 32, रा. मेणवली, ता. वाई), डॉ. सुनंदा विलास सोनावणे (रा. ब्राह्मणशाही, वाई), शामराव रामचंद्र दुधाणे (वय 46, रा. खिंगर, ता. जावळी), रमेश पवार (रा. धोम कॉलनी, वाई) अशी या बेपत्ता व्यक्तींची नावे आहेत.
 

पोळ हा सिरियल किलर असल्याचे काल पोलिस तपासात पुढे आले आहे. त्याने पुरलेले चार मृतदेह पोलिसांनी काल खणून काढले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वाई परिसरातून बेपत्ता झालेल्या आणखी आठ व्यक्तींचे नातेवाईक पुढे आले आहेत. दीपाली ही महाविद्यालयीन युवती प्रवेश घेण्यासाठी 2002 मध्ये घरातून बाहेर पडली होती. ढगे हे पानपट्टी चालक 2001 पासून बेपत्ता आहेत. चिकणे हे मुंबईला जाण्यासाठी 2012 मध्ये घरातून बाहेर पडले होते. गोवंडे 2010, डॉ. सोनावणे, दुधाणे 15 ऑगस्ट 2011, पवार 2013 मध्ये बेपत्ता झाले आहेत. यातील दुधाणे, चिकणे व पवार, डॉ. सोनावणे यांची पोळशी ओळख होती. या सर्वांचा पोळने घातपात केला असल्याचा संशय त्यांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे, तसेच त्या अनुषंगाने तपास करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर वाई येथे झालेल्या रमणलाल ओसवाल यांच्या खूनप्रकरणातही पोळचा हात आहे का, याचा तपास करण्याची मागणी त्यांच्या मुलाने पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे एकूण आठ नातेवाइकांकडून पोळवर संशय व्यक्त झाला आहे. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढते, की काय अशी भीती व्यक्त होत आहे.

स्वतंत्र तपास अधिकारी
बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाइकांनी पोळवर संशय व्यक्त करत तपासाची मागणी केली आहे. नातेवाइकांच्या या मागणीची पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. प्रत्येक तक्रारीचा सखोल तपास व्हावा, यासाठी प्रत्येक बेपत्ता व्यक्तीच्या तपासासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्तीचे आदेश त्यांनी दिले आहेत.

पोळची उंब्रजमध्ये आणून चौकशी
उंब्रज - वाई- धोम खूनसत्रातील संशयित डॉ. संतोष पोळ यास आज दुपारी तीनच्या सुमारास उंब्रज येथे तपासासाठी आणण्यात आले होते. त्याने 2006 मध्ये वनिता गायकवाड यांचा खून करून मृतदेह धोम धरणात टाकला होता. त्यानंतर कृष्णा नदीत शिवडे हद्दीत एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. त्याची खात्री करण्यासाठी आपण त्या वेळी उंब्रज येथे गेलो होतो, अशी माहिती त्याने पोलिसांना तपासात दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी आज त्याला येथे आणले होते. त्याने जागाही दाखविली; परंतु मृतदेहाची खात्री करण्यासाठी कोणी बोलावले होते. हे तो सांगू शकला नाही. मात्र, संबंधित महिलेचा मृतदेह त्या ठिकाणी सापडला होता, की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. तशी नोंद कोणत्याही पोलिस ठाण्यात नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्याच्या म्हणण्याला आधार मिळत नाही. येथील तपासानंतर पोलिस त्याला घेऊन पुन्हा वाईकडे रवाना झाले.

पोळ हा बोगस डॉक्‍टर
दरम्यान, संतोष पोळ हा बोगस डॉक्‍टर आहे. त्याच्याकडे कुठल्याही स्वरूपाची वैद्यकीय पदवी नाही, अशी माहिती महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. रवी वानखेडकर यांनी "सकाळ‘शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, ‘पोळ एका हॉस्पिटलमध्ये बरीच वर्षे कंपाउंडर होता. नंतर त्याने गावात थेट वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्याच्याकडे कुठल्याही स्वरूपाची वैद्यकीय पदवी नाही. त्याला डॉक्‍टर संबोधले जात असल्याने वैद्यकीय व्यवसायाच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. त्याविषयी काळजी घेतली जावी. हे प्रकरण पुढे आल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने तो डॉक्‍टर आहे किंवा नाही, याविषयी सखोल तपासणी केली. त्यात तो डॉक्‍टर नसल्याचे समोर आले.

खुनाचे सहा गुन्हे दाखल होणार
संतोष पोळवर सध्या मंगल जेधे यांच्या खुनाचा एकच गुन्हा वाई पोलिस ठाण्यात दाखल आहे. त्याच्यावर आणखी पाच जणांच्या खुनाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गुन्ह्याची स्वतंत्र फिर्याद घेण्याचे काम वाई पोलिस ठाण्यात सुरू आहे, तसेच या गुन्ह्यांच्या तपासासाठी प्रशिक्षित व तपास कामात तरबेज असणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तीन स्वतंत्र पथकेही तयार करण्यात आली आहेत.

नथमल भंडारींचा रुग्णवाहिकेतच खून
संतोष पोळने घोटवडेकर हॉस्पिटलमधून चोरलेल्या रुग्णवाहिकेमध्येच नथमल भंडारींचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. सोने दुप्पट करून देतो, असे सांगून त्याने नथमल यांच्याकडून दहा तोळे सोने घेतले होते. बरेच दिवस झाल्याने ते सोने परत देण्यासाठी त्याच्या मागे लागले होते. जवळच राहत असल्याने त्यांचा रोजचाच तगादा त्याच्या पाठीमागे लागला होता. सोने लवकर दिले नाही तर, पोलिसांकडे जाईन असे त्यांनी त्याला सांगितले होते. त्यातच त्या वेळी त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. दुसरा गुन्हा दाखल झाला तर जड जाईल म्हणून त्याने त्यांचा काटा काढायचे ठरविले. सोने देतो असे म्हणून तो त्यांना रुग्णवाहिकेने पुण्याकडे घेऊन चालला होता. वाटेतच त्याने त्यांना इंजेक्‍शन देऊन संपविले. त्यानंतर फार्म हाउसवर जाऊन त्याने त्यांचा मृतदेह पुरला. सलमा शेख यांचा खूनही अशाच पद्धतीने रुग्णवाहिकेत केला असण्याची शक्‍यता आहे.

पोळला उद्या न्यायालयात हजर करणार
मंगल जेधे खून प्रकरणामध्ये संतोष पोळच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या संपणार आहे. त्यामुळे त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे पोलिसांना तपासासाठी जादा वेळ आवश्‍यक आहे. त्यामुळे पोलिस कोठडीची मुदत वाढवून मिळण्याची मागणी पोलिस करणार आहेत.

पोळची बॅंक खाती गोठविणार
संतोष पोळच्या आर्थिक व्यवहारांचीही पोलिस तपासणी करणार आहेत. त्याच्या बॅंक खात्यांचे व्यवहार तपासले जाणार आहे. त्यासाठी त्याच्या बॅंक खात्याची माहिती घेऊन पोलिसांनी सात बॅंकांना खाती गोठविण्यासाठी पत्र दिले आहे. बॅंकांना सुट्टी असल्यामुळे अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. मात्र, त्या अनुषंगाने पोलिसांचा पाठपुरावा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com