अखेरचा दिवस नेत्यांची गर्दी, शक्तिप्रदर्शनाचा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

सांगली - सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय दोन्ही जिल्ह्यांतून आलेल्या नेते मंडळींनी गजबजून गेले. राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे यांचा उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शन करीत दाखल झाला. त्याआधी भाजपच्यावतीने नगरसेवक युवराज बावडेकर यांनी खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जयंत पाटील हे नेते उपस्थित होते.

सांगली - सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय दोन्ही जिल्ह्यांतून आलेल्या नेते मंडळींनी गजबजून गेले. राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे यांचा उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शन करीत दाखल झाला. त्याआधी भाजपच्यावतीने नगरसेवक युवराज बावडेकर यांनी खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जयंत पाटील हे नेते उपस्थित होते. एकूणच, निवडणुकीवर गेल्या महिन्याभरात रणकंदन पेटले असताना आज प्रथमच भाष्य करणाऱ्या खासदार संजय पाटील यांनी या निवडणुकीत वादळ निर्माण करणार असल्याचे सांगत आम्ही किंग किंवा किंगमेकर ठरू, असा दावा केला. 

श्री. गोरे यांनी आज दोन्ही जिल्ह्यांतील नेते, कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन केले. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, आमदार जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार सुमन पाटील यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसने काल (मंगळवारी) सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून शेखर गोरे यांची उमेदवारी जाहीर केली होती. श्री. गोरे यांनी सकाळी सांगलीत आल्यानंतर वसंतदादा पाटील, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या वेळी नेते जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, शहराध्यक्ष संजय बजाज उपस्थित होते. त्यानंतर उमेदवार श्री. गोरे यांनी स्टेशन चौकापासून फेरी काढून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना अर्ज सादर केला. 

चार आमदार आणि एक खासदार असे बळ असलेल्या भाजपलाही आज जाग आली. नगरसेवक युवराज बावडेकर यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. यानिमित्ताने खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख एकत्र आले. या वेळी आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, विलासराव जगताप, जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, भाजपचे युवा नेते अरविंद तांबवेकर, शरद नलवडे, केदार खाडिलकर, गणपती साळुंखे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 
अर्ज दाखल केल्यानंतर खासदार पाटील म्हणाले, ""पक्षादेश मानून अर्ज दाखल केला. यापुढील रणनीती मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा करून ठरवली जाईल. जिल्ह्यात आमची ताकद वाढत आहे. या निवडणुकीत आमची संख्या निर्णायक ठरणार आहे. पैशाची लढाई सुरू आहे, त्याला पायबंद घातला पाहिजे, अशी भाजपची ठाम भूमिका आहे.'' 

आमदार विलासराव जगताप म्हणाले, ""सध्या पैशाचा खेळ सुरू आहे. मतदारांना विकत घेण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्याला वसंतदादा आणि राजारामबापूंची गौरवशाली परंपरा आहे. ती धुळीस मिळवण्याचे काम सुरू आहे. मतदार त्यांची जागा दाखवून देतील.'' 

भांडण दोन कोल्ह्यांचे 
जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, ""या निवडणुकीत यंदा चमत्कार घडविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सध्या दोन कोल्ह्यांची भांडणे सुरू आहेत. त्याचा लाभ आम्हाला होईल. त्यांचा मुकाबला करण्यासाठी भाजपसह स्वाभिमानी, शिवसेना, रासपसह सर्व मित्रपक्ष एकत्रितरीत्या ही निवडणूक लढविणार आहोत. निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेला घोडेबाजार थांबला पाहिजे.''

Web Title: eight nominations for the Legislative Council