कोयनेत आठ, चांदोलीत दीड टीएमसी पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

सांगली - गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून सातत्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने यंदा पाण्याची पातळी अवघी आठ टीएमसीवर आली. ही पाणीपातळी मृतसाठा सोडून आहे. पाऊस लांबला तर कृष्णाकाठी जलसंकट येऊ शकते. 

सांगली - गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून सातत्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने यंदा पाण्याची पातळी अवघी आठ टीएमसीवर आली. ही पाणीपातळी मृतसाठा सोडून आहे. पाऊस लांबला तर कृष्णाकाठी जलसंकट येऊ शकते. 

पाच टीएमसी इतके पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. अजून तीन टीएमसी पाणी सिंचनासाठी उपसले जाऊ शकते. कोयना धरणात आठ तर चांदोली धरणात अवघे दीड टीएमसी इतके पाणी आहे. जिल्ह्याला चिंता वाटावी, अशी ही स्थिती आहे. यंदा सरासरी इतका पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला गेला असला तरी पावसाचे आगमन लांबू शकते, असाही अंदाज आहे. अशावेळी धरणातील पाण्याने तळ गाठणे, चिंताजनक आहे.

कृष्णा नदीकाठची शहरे, गावे आणि एकूणच सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही भागाला कृष्णेचे पाणी पुरवले जाते. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा राखीव साठा ठेवण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. पाच टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले तर पुढील एक ते दीड महिना किमान पिण्याचे पाणी पुरेसे ठरू शकते. या काळात पाऊस सुरू झाला तर उपसा सिंचन योजना चालवण्याची गरज उरणार नाही. तोवर तीन टीएमसी पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो. 

दुसरीकडे कृष्णा नदीतून थेट पाणी उपसा करून शेती करणाऱ्यांवर पुन्हा एकदा बंधन येणार आहे. चार दिवस उपसा आणि पुढील चार दिवस उपसाबंदी असा फेरा नियोजित केला आहे. तो कुठल्याही क्षणी लागू केला जाऊ शकतो. सध्या टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेचा उपसा सुरू आहे. तोही तीन टीएमसीचा कोटा संपण्याआधी बंद करण्याचे नियोजन आहे. या स्थितीत वेळेवर पाऊस यावा, त्याने मुक्काम ठोकावा, एवढी अपेक्षा शेतकऱ्यांना असेल. अन्यथा, जिल्ह्यातील शेतीवरच काय, पिण्याच्या पाण्यावरही पाणीबाणी येऊ शकते. 

कृष्णाकाठच्या नागरी वस्त्यांसाठी पिण्याचे पाणी राखून ठेवून नियोजन केले आहे. पाच टीएमसी पाणी राखून ठेवले जाईल. नागरिक, शेतकऱ्यांच्या सहकार्याने पाण्याचे संभाव्य संकट टाळता येईल. पाऊस वेळेवर सुरू झाला तर प्रश्‍न उद्‌भवणार नाही.
-हनुमंत गुणाले, 

अधीक्षक अभियंता, कृष्णा खोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eight TMC water in Koyna and 1.5 TMC water in Chandoli