राज्यात ६० ठिकाणी नवी रुग्णालये

राज्यात ६० ठिकाणी नवी रुग्णालये

कोल्हापूर - ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजनेंतर्गत राज्यात ६० ठिकाणी नवी रुग्णालये उभारण्यात येणार आहेत. यातील काही रुग्णालये दुर्गम भागात असून, त्यांच्या माध्यमातून या भागातही चांगल्या आरोग्य सेवा पुरवल्या जातील, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यांच्या हस्ते सेवा रुग्णालयाच्या नूतन वास्तूचे उद्‌घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

कसबा बावडा येथे शाहू महाराजांनी सेवा रुग्णालय नावाने दवाखाना सुरू करून सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक व्यापक केली. याच ठिकाणी आता सर्वोत्तम आरोग्य सेवा देणारे ५० बेड क्षमतेचे रुग्णालय नव्याने बांधण्यात आले आहे. याचे उद्‌घाटन आज आरोग्यमंत्री शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. 

शिंदे म्हणाले, ‘सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही योजना कार्यान्वित केली आहे. या माध्यमातून राज्यात ६० नवे दवाखाने सुरू करण्यात येतील. यातील काही दवाखाने हे दुर्गम भागात असणार आहेत.’  

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी फंड (सीएसआर) या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी सुमारे ११०० कोटी रुपयांचा निधी आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करून दिला आहे. सीपीआरमधील ट्रामा सेंटरमधील कर्मचाऱ्यांचा पगार देखील सीएसआरमधून होत आहे. सेवा रुग्णालयातील लिफ्ट आणि फर्निचरचे कामही तत्काळ सुरू करून हा दवाखाना अधिक सक्षम करू.’  

आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रास्ताविकातून कोल्हापूर शहरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, आमदार सुजित मिणचेकर, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम, एनयूएचएमचे अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार, धैर्यशील माने उपस्थित होते. 

दादा, क्षीरसागरांचे परिवर्तन झाले 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘दादांना राज्यातील कोणत्याही आमदाराने फोन केला की त्याचे काम होते. रस्ते, निधी सर्व कामे दादा तातडीने मार्गी लावतात. आता गाडीमधून येताना आमदार राजेश क्षीरसागरही तुमचे कौतुक करत होते. त्यांचेही परिवर्तन झाले आहे.’’ 

३० लाखांची लिफ्ट सात लाखांत 
सेवा रुग्णालयाच्या डॉ. कदम यांच्याबरोबर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली. यावेळी रुग्णालयात लिफ्टची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तेथील काही अधिकाऱ्यांना त्यांनी यासाठीचा खर्च विचारला. ते म्हणाले, ३० लाख रुपये लागतील. मग दादा म्हणाले, ‘‘गेल्या आठवड्यात एका संस्थेतील लिफ्ट सात लाखांत झाली. मग ही ३० लाखांत कशी?’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com