एकीव शाळेची ‘लीडरशिप’साठी निवड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

कास - मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेंतर्गत शालेय नेतृत्व विकसन कार्यक्रमासाठी देशभरातील शंभर शाळांमधून जावळी तालुक्‍यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकीव या शाळेची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून केवळ तीन शाळांची निवड झाली असून, त्यात जिल्ह्यातील एकीव ही डोंगरदऱ्यातील एकमेव शाळा ठरली आहे. 

कास पठाराच्या पश्‍चिमेला दुर्गम भागात असलेल्या एकीव शाळेत एक ते आठवीपर्यंतचे वर्ग असून, सव्वीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेने स्वच्छ सुंदर शाळा, शिष्यवृत्ती, ज्ञानरचनावाद, सुंदर बाग, बोलका व्हरांडा, संगणक शिक्षण, परसबाग, सांस्कृतिक कार्यक्रम, लेझीम, वृक्षारोपण, वन्य प्राणी संवर्धनात योगदान, मुलांचा वाद्यवृंद आदी उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.

ग्रामस्थांनीही शिक्षकांची धडपड पाहून श्रमदान, रोख व वस्तूरूपाने शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण केल्या आहेत. मानव संसाधन विभागाकडे अडीच हजार शब्दांचा प्रबंध व शाळेची सर्वांगीण रूप दाखवणारी पीपीटी दिल्ली येथे परिषदेत दाखविण्यात येणार आहे. शाळा आदर्श बनवण्यासाठी गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल यांनी वेळोवेळी भेट देवून प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश धनावडे यांनी सहकारी शिक्षक सुरेश सपकाळ, मनीषा सातघरे, पूजा प्रभुणे यांच्या प्रयत्नातून शाळेचा नावलौकिक देशपातळीवर पोचवला आहे. 

शाळेच्या यशस्वितीचे सादरीकरण करण्यासाठी मुख्याध्यापक प्रकाश धनावडे हे दिल्ली येथे २२ ते २४ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेसाठी सहभागी होणार आहेत.

Web Title: Ekiv School Clean Selection