"एकरुख'साठी 412 कोटींची "सुप्रमा'

संतोष सिरसट
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

सोलापूर : एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा विभागाने 412 कोटी 80 लाख रुपयांच्या निधीस आज सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) दिली आहे. ही मान्यता देताना 2013-14 च्या दरसूचीचा आधार घेतला आहे. जून 2019 पर्यंत या योजनेच्या माध्यमातून 10 हजार हेक्‍टरची सिंचन क्षमता निर्माण करण्याच्या सूचनाही जलसंपदा विभागाने दिल्या आहेत. 

एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी कारंबा पंपगृहाद्वारे हिप्परगा-एकरुख तलावात सोडण्यात येणार आहे. एकरुख तलावातून हे पाणी दोन टप्यात उपसा केले जाणार आहे. दर्गनहळ्ळी (ता. दक्षिण सोलापूर) कालव्याद्वारे दक्षिण सोलापूर तालुक्‍याच्या अवर्षण प्रवण असलेल्या 21 गावातील सात हजार 200 हेक्‍टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर दर्शनाळ कालव्याद्वारे हरणा नदीमार्गे बोरी मध्यम प्रकल्पामध्येही सव्वा एक टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.

बोरी मध्यम प्रकल्पामध्ये सोडलेल्या पाण्याचा उपयोग अक्कलकोट तालुक्‍यातील गावांना होणार आहे. 412 कोटी 80 लाख निधीपैकी प्रत्यक्ष कामासाठी 380 कोटी 85 लाख रुपये खर्च करता येणार आहे. उर्वरित 32 कोटी 55 लाख रुपये आनुषंगिक बाबीसाठी खर्च करता येणार आहेत. भूसंपादन व वितरण व्यवस्थेसाठी या पैशाचा उपयोग करायचा आहे. 

बंदिस्त नलिकेचा करा वापर 

या योजनेचे काम करताना ज्याठिकाणी तांत्रिकदृष्ट्या शक्‍य आहे, त्याठिकाणी बंदिस्त नलिकेचा वापर करण्याच्या सूचनाही जलसंपदा विभागाने अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामुळे पाण्याचा अपव्यय टळणार आहे. लाभक्षेत्रामध्ये पाणी वापर संस्था स्थापन करण्याच्या सूचनाही ही "सुप्रमा' देतेवेळी केल्या आहेत. 

Web Title: For Ekrukh 412 crores SPM