मोठ्या भावाने केला आईसह भावाचा खून; बायकोवरही केले वार

सचिन शिंदे
सोमवार, 9 एप्रिल 2018

घर विकण्याच्या वादावरुन आई आणि लहान भावाचा मोठ्या भावाने खून केला. 

कऱ्हाड - सेवानिवृत्त नायब तहसिलदारांच्या थोरल्या मुलाने घर विकण्यास विरोध केल्याने धाकट्या भावासह आपल्या आईचा गुप्ती वार करून तसेच विटा तसेच लोखंडी पाईपने मारहाण करून निर्घृण खून केला. मलकापूर (ता. कराड) येथे सोमवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. राजेश गजानन घोडेके (वय 40) आणि जयश्री गजानन घोडके (वय 63) असे त्या दुर्दैवी मायलेकांची नावे आहेत. तर राकेश गजानन घोडके (वय 43) असे संशयिताचे नाव आहे. या दोन्ही खुनापूर्वी संशयिताने आपल्या बायकोवरही वार केला होता. 

घोडके कुटूंबे साळशिरंबे येथील असून ते मलकापूर येथील आझाद कॉलनीत वास्तव्यास आहे. मलकापूरमधील घर विकण्याचा तगादा लावला होता. मयत राजेश हे इस्लामपूर येथे भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत होते. त्यांची नुकतीच फलटण येथे बदली झाली होती आणि ते सोमवारी हजर होणार होते. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास भाऊ राजेश व आई जयश्री यांचा राकेश याने गुप्तीने आठ ते दहा वार करून खून केला. तसेच अंगणातील लोखंडी पाईप व बादली डोक्यात घालून खून केला. खून केल्यानंतर संशयित राकेश अंगणातच बसून होता. त्यावेळी मलकापूरमध्ये राहणारे कराड शहर पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सतीश जाधव आणि होमगार्ड शेडगे यांनी मोठ्या धाडसाने हातात गुप्ती व लोखंडी पाईप असताना त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. दरम्यान, आई व भावाचा खून करण्यापूर्वी संशयिताने आपल्या बायकोवरही एक वार केला होता.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Elder Brother Killed His Mother And Younger Brother