राष्ट्रवादीबरोबरची युती सेनेला भोवली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

मलकापूर : येथील नगरपालिका निवडणुकीचा निकाल शिवसेनेला जोरदार धक्का देणारा ठरला आहे. आमदारकीला मोठी साथ देणाऱ्या मलकापुरात आमदार सत्यजित पाटील यांचा करिश्‍मा अधिक चालला नसल्याचे स्पष्ट झाले. भारतीय जनता पार्टीने मात्र या वेळी जनसुराज्यच्या साथीने पालिकेत चांगलीच मुसंडी मारली आहे.

मलकापूर : येथील नगरपालिका निवडणुकीचा निकाल शिवसेनेला जोरदार धक्का देणारा ठरला आहे. आमदारकीला मोठी साथ देणाऱ्या मलकापुरात आमदार सत्यजित पाटील यांचा करिश्‍मा अधिक चालला नसल्याचे स्पष्ट झाले. भारतीय जनता पार्टीने मात्र या वेळी जनसुराज्यच्या साथीने पालिकेत चांगलीच मुसंडी मारली आहे.

आमदार सत्यजित पाटील यांनी गतवेळी शहर विकास आघाडीच्या नावाखाली नगरपालिका निवडणूक लढवली. त्यावेळी पाच जागा मिळाल्या. त्यामुळे गेली पाच वर्षे शिवसेनेला पालिकेत विरोधी पक्ष म्हणून काम करावे लागले. या काळात सेनेच्या सदस्यांनी सत्ताधारी गटास चुकीच्या कामात विरोध केला, पण त्याचा ठोस पाठपुरावा केला नाही. शिवाय या वेळी थेट राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. पंरतु या आघाडीवर शहरात नाराजी होती. त्याचा फटका शिवसेनेला बसला. सेनेचे तीन विद्यमान नगरसेवक पराभूत झाले. तर अन्य जागा हातातून गेल्या. राष्ट्रवादीशी केलेली आघाडी आणि नगरपालिकेतील गेल्या पाच वर्षांतील गोंधळाचा कारभार याचा फटका सेनेला अधिक बसला. राष्ट्रवादीचेही केवळ तीन उमेदवार या वेळी निवडणुकीत होते. ते विजयी झाले असले तरी विद्यमान नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचा केवळ 21 मतांनी झालेला विजय आत्मचिंतन करायला लावणारा आहे. गतवेळी राष्ट्रवादीचे सात सदस्य पालिकेत होते. 

पालिकेतील मनमानी कारभार, घरफाळा, पाणीपट्टी घोटाळा, अंगणवाडी सेविका मदतनीस भरती घोटाळा, निधीचा गैरवापर यांसह विविध चौकशा हे भाजपने प्रचारात आणलेले ठळक मुद्दे शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी खोडू शकली नाही. याउलट भाजपने जनसुराज्यच्या साथीने नागरिकांत पालिकेतील गोंधळाचा कारभार स्पष्ट केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री विनय कोरे व केडीसीसी बॅंक संचालक सर्जेराव पाटील यांनी दिलेल्या आश्‍वासनांना मतदारांनी पसंती दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. 

भाजपला संधी 
या वेळी नगराध्यक्षांसह भाजपला सहा तर जनसुराज्यला चार जागा मिळाल्या आहेत. विरोधी शिवसेनेला पाच व राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या आहेत. आगामी पाच वर्षांच्या काळातील या आघाड्यांची कामाची विश्‍वासार्हता त्यांची वाटचाल अधिक गतिमान करेल. पंरतु भाजपने प्रथमच एन्ट्री करून थेट नगराध्यक्ष पद पटकावले. आता त्यांना शहरात पक्ष वाढवण्याची संधी आहे. त्याचा वापर ते कसे करतात हे पहावे लागेल.

Web Title: Election Analysis : Shiv Sena lost; BJP gains in Malkapur