स्थायी सभापतीसह विषय समित्यांच्या ऑक्‍टोबरमध्ये सभापती निवड 

बलराज पवार 
Tuesday, 29 September 2020

स्थायी समिती सभापतीसह विषय समित्यांच्या सभापतींची निवड ऑक्‍टोंबरमध्ये होण्याची शक्‍यता आहे. महापौर गीता सुतार यांनी आज स्थायीच्या नूतन सदस्य निवडीच्या ठरावावर स्वाक्षरी केली.

सांगली : स्थायी समिती सभापतीसह विषय समित्यांच्या सभापतींची निवड ऑक्‍टोंबरमध्ये होण्याची शक्‍यता आहे. महापौर गीता सुतार यांनी आज स्थायीच्या नूतन सदस्य निवडीच्या ठरावावर स्वाक्षरी केली. उद्या (ता. 29) आयुक्तांच्या मान्यतेने सर्व सभापती निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे. त्यांच्याकडून सभापती निवडीचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात येईल. त्यानुसार या निवडी होतील. 

स्थायी समितीच्या नवीन आठ सदस्यांच्या निवडी गेल्या आठवड्यात झाल्या. त्या पाठोपाठ महिला बालकल्याण, समाजकल्याण समिती सभापतींची मुदतही संपुष्टात आली. तसेच चार प्रभाग समित्यांच्या सभापती निवडीही कोरोनामुळे प्रलंबित आहेत. या सर्व निवडी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ताब्यात मिळण्यासाठी स्थायी समितीचे सभापतीपद पटकवण्यासाठी मोठी चुरस आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे नऊ तर कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सात असे काठावरचे बहुमत आहे. 

विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने निवडणुकीची तारीख आणि प्रक्रिया अंतिम केली जाते. त्यानंतर सात सभापती निवडीसाठी दिवसभर कालावधी लागणार आहे. त्यामुळे सर्व सभापती निवडीच्या तयारीसाठी किमान 15 दिवस कालावधी लागणार आहे. त्यानुसार दुसऱ्या आठवड्यातच निवड होईल, असा अंदाज आहे. 

इच्छूक वाढू लागले 
पुढील वर्षी फेब्रुवारीत महापौरपदाची निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. ते खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने त्याची समीकरणे आतापासूनच सुरु होणार आहेत. त्यामुळे स्थायी सभापती निवडीत इच्छूकांची संख्या वाढू लागली आहे. भाजपच्या पहिल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात सांगली, मिरजेला महापौर, सभापतीपद मिळाले आहे. मात्र भाजपला मोठी साथ देणाऱ्या कुपवाडला पदापासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे आता तरी कुपवाडला संधी मिळावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी कुपवाडमधून गजानन मगदूम, राजेंद्र कुंभार हे इच्छूक आहेत. तर सांगलीतून सविता मदने आणि मिरजेतून पांडुरंग कोरे इच्छुक आहेत. या सर्वांनी नेत्यांकडे आपल्याच नावासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्याचबरोबर भाजपमधील नाराजीचा फायदा उठवून धक्का देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीनेही व्यूह रचना करण्याची तयारी केली आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election of Chairpersons of Subject Committees in October