आता घुमणार ः आपली मतेऽऽ... सीसीटीव्हीला... फोन चार्जरलाऽऽऽऽ 

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 9 डिसेंबर 2019

89 चिन्हे पोचली 190 वर 
राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांची चिन्हे राखीव आहेत. अन्य नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक आयोग दरवेळी विविध मुक्त चिन्हे जाहीर करतो. त्यातून या उमेदवारांना आपले चिन्ह निवडावे लागते. यापूर्वी 89 मुक्त चिन्हे होती. त्यापैकी काही चिन्हे वगळून आणि काही नव्याने समावेश करून यावर्षी मुक्त चिन्हे निवडण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामधून उमेदवारांना चिन्हाची मागणी करता येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत या चिन्हांची मागणी करता येणार आहे. 

सोलापूर ः राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकांच्या प्रचारावेळी, आता आपली मते सीसीटीव्हीला, आपली मते संगणकाला आणि आपली मते लॅपटॉपला... असा प्रचार ऐकायला आला तर आश्‍चर्य वाटणार नाही, कारण राज्य निवडणूक आयोगानेच ही मुक्त चिन्हे निश्‍चित केली आहेत. त्याची यादी राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.

दैनंदिन वापरातील वस्तू, व्यक्तिगत साधने, दळणवळणाची साधने, फळे, भाज्या, स्वयंपाकघरातील वस्तू, खेळ, कृषी क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, अत्याधुनिक संगणक युगातील साधने आदी विविध क्षेत्रांतील साधनांचा मुक्त चिन्हांमध्ये समावेश करून आयोगाने सर्वसमावेशकता जपली आहे. मुक्त चिन्हांमध्ये हेल्मेटचा समावेश करून आयोगाने एक प्रकारे दुचाकी चालकाच्या जीविताच्या रक्षणासाठी संदेशच दिला आहे. 

तब्बल 190 मुक्त चिन्हे 
राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे त्यांना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुक्त चिन्हांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची संख्या पहाल तर चकित व्हाल...! तब्बल 190 मुक्त चिन्हे निश्‍चित करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे मुक्त चिन्हे निश्‍चित करताना आधुनिक काळातील यंत्रे आणि साहित्याचा त्यात समावेश करण्यात आला आहे. 

244 पक्षांची आयोगाकडे झाली नोंदणी 
राज्य निवडणूक आयोगाकडे सहा राष्ट्रीय, महाराष्ट्र राज्यातील राज्यस्तरीय दोन, इतर राज्यातील राज्यस्तरीय पक्ष आठ आणि इतर पक्ष 244 इतक्‍यांची नोंद आहे. नोंदणीकृत पक्षांसाठी चिन्हे निश्‍चित आहेत. मात्र इतर पक्षांसाठी मात्र चिन्हांची कमतरता जाणवत होती. त्यामुळे ही चिन्हे निश्‍चित करण्यात आली आहेत. त्यात आधुनिकताही आली आहे. सीसीटीव्ही, संगणकाचा माऊस, डिश ऍन्टेना, हेडफोन, हेल्मेट, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, फोन चार्जर ही काही अत्याधुनिक प्रणालीतील चिन्हांची यादी आहे. 

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.

 

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.

जुन्यासह आधुनिकतेचा संगम महाराष्ट्र 
जुन्या काळातील वाळूचे घड्याळ, दळणाचे जाते, उखळ, नरसाळे, धान्य पाखडण्याचे सूप, ग्रामोफोन, टाइपरायटर, डिझेल पंप ते आधुनिक काळातील लॅपटॉप, कॉम्प्युटरचा माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, पेनड्राइव्ह, रोबोट, हेडफोन अशा नव्या-जुन्याचा संगम या मुक्त चिन्हांमध्ये करण्यात आला आहे. टूथब्रश, टूथपेस्टपासून ते रेझर, साबणदानी, चप्पल, बूट, मोजे, उशी आदी व्यक्तिगत वापराच्या वस्तूंनाही निवडणूक चिन्हांमध्ये स्थान मिळाले आहे. ऊस शेतकरी, नारळाची बाग, डिझेल पंप, ट्रॅक्‍टर चालविणारा शेतकरी, शेतीच्या मशागतीसाठीचे टीलर, विहीर अशा चिन्हांचा समावेश करून आयोगाने एकप्रकारे शेतीचे महत्त्व लक्षात घेतले आहे. 

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.

विविध क्षेत्रातील चिन्हांचा समावेश 
गॅस सिलिंडर, गॅस शेगडी, रेफ्रिजरेटर, मिक्‍सर, प्रेशर कुकर, हंडी, कढई, तळण्याची कढई (फ्राईंग पॅन), काचेचा ग्लास, ट्रे, कपबशी, चहाची गाळणी, उखळ आणि खलबत्ता, सिमला मिर्ची, फूलकोबी, हिरवी मिरची, भेंडी, आले, मटार, फळांची टोपली, सफरचंद, द्राक्षे, नासपती, फणस, अननस, अक्रोड, बिस्कीट, ब्रेड, केक आदी मुक्त चिन्हे ठरविताना आयोगाने स्वयंपाकघराला मान दिला आहे. यासोबत रिक्षा, ट्रक, हेलिकॉप्टर, जहाज अशी रस्ते तसेच जलवाहतुकीची साधने, विटा, थापी, करवत, कडी, कुलपाची चावी असे बांधकाम साहित्य, बॅट, बुद्धिबळ पट, कॅरम बोर्ड, फुटबॉल, ल्युडो, स्टम्प, हॉकी स्टीक आणि बॉल, टेनिस रॅकेट आणि बॉल अशी खेळांची साधने तसेच क्रिकेट फलंदाज, फूटबॉल खेळाडू यांच्यासह मोत्यांचा हार, हिरा, अंगठी असे मौल्यवान दागिने, हार्मोनियम, सितार, व्हायोलीन अशी संगीताची साधने यांच्यासोबतच अनेक विविध क्षेत्रांतील साधने मुक्त चिन्हांमध्ये समाविष्ट आहेत. 

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.

 

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election commission fainal free symbols