लाड, आसगावकर यांच्या विजयासाठी महाविकास आघाडी सरसावली

सकाळ वृत्तसेवा | Tuesday, 17 November 2020

उमेदवार अरूण लाड व जयंत आसगावकर यांनी आपल्याला निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सांगली : पुणे विभागातील पदवीधर शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे जयंत आसगावकर यांच्या प्रचाराच्या नियोजन बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अरुण लाड यांना विजयी करून जिल्ह्यातील महाविकास आघाडीची ताकद दाखवून देऊ असा नारा कार्यकर्त्यांनी दिला. उमेदवार अरूण लाड व जयंत आसगावकर यांनी आपल्याला निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले की, बुथ निहाय काम करीत आपण स्वतः उमेदवार आहोत असे समजून प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे. कार्यकर्त्यांनी गाफील न राहता कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्यासाठी जीवाचे रान करावे. प्रत्येक कार्यकर्ता विजयासाठी काम करेल असा मला विश्वास आहे. कॉंग्रेसचे शहरजिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले की, सरकार स्थापनेनंतर ही पहिलीच निवडणूक आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस एकसंध पणे लढली त्या निवडणुकीत झालेल्या मदतीचा कॉंग्रेस पैरा फेडेल. तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. त्या मदतीने भाजपची मक्तेदारी मोडीत काढू.

हेही वाचा - पर्यटकांनो सावधान ! पाळंदे किनारपट्टीवर पोहायला येताय ? -

Advertising
Advertising

विशाल पाटील म्हणाले, भाजपला शिक्षक मतदारसंघात उमेदवार मिळाला नाही. तसेच पदवीधर मतदारसंघात देखील नेहमीच आरएसएसच्या विचारांचा उमेदवार देणाऱ्या भाजपला अरुण लाड यांच्या सारख्या तगड्या उमेदवारा समोर राष्ट्रवादी कॉंग्रेस मधून आयात केलेल्या संग्राम देशमुख यांना उमेदवारी द्यायला लागते यातच त्यांचा पराभव झाला आहे. जयश्रीताई पाटील म्हणाल्या, दोन्ही उमेदवार विजयी होण्यासाठी कॉंग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता काम करेल असा मी विश्वास व्यक्त करते.
 युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार म्हणाले, महापालिका क्षेत्रातील पदवीधर मतदारांच्या प्रभाग निहाय याद्या तयार आहेत. युवक राष्ट्रवादी प्रचारात अग्रभागी असेल. प्रत्येकी मताची जबाबदारी घेत आपण मतदारांच्या घरी जाणे आवश्‍यक आहे. 

शिवसेनेचे अजिंक्‍य पाटील, शंभोराज काटकर, मयूर घोडके यांनीही आम्ही शेवटच्या मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्नशील राहू असे सांगितले. यावेळी सिकंदर जमादार, मैनुद्दीन बागवान, उत्तम साखळकर, अजिंक्‍य पाटील, अनिल शेटे, रावसाहेब घेवारे, पद्माकर जगदाळे, धनपाल खोत, आयुब बारगीर, अभिजीत हारगे, संजय तोडकर, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे, वैशाली कळके, शुभम जाधव, अमृता चोपडे, आशा पाटील, आदी उपस्थित होते.

हेही वाचा - तब्बल आठ महिन्यांनी पन्हाळा फुलला ; सुटी साधून पर्यटकांची गर्दी -

कॉंग्रेस फेडणार मदतीचा पैरा

विधानसभा, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला भक्कमपणे मदत केली. त्या मदतीचा पैरा या निवडणूकीत फेडण्याचा निर्धार कॉंग्रेसच्या नेत्यांनी बैठकीत व्यक्त केला.

 

संपादन - स्नेहल कदम