निवडणुकीतून दिग्गज रिंगणाबाहेर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - पाच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतः किंवा नातेवाइकांच्या रूपाने रिंगणात उतरलेले दिग्गज या वेळी रिंगणाबाहेर आहेत. या वेळी केवळ पाच विद्यमान रिंगणात असून काहींना आरक्षणाचा फटका बसला तर काहींनी जाणीवपूर्वक या मैदानाचा नादच सोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

कोल्हापूर - पाच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतः किंवा नातेवाइकांच्या रूपाने रिंगणात उतरलेले दिग्गज या वेळी रिंगणाबाहेर आहेत. या वेळी केवळ पाच विद्यमान रिंगणात असून काहींना आरक्षणाचा फटका बसला तर काहींनी जाणीवपूर्वक या मैदानाचा नादच सोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

गेल्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद, के. पी. पाटील यांचे पुत्र रणजित, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील स्वतः, "गोकुळ'चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या पत्नी सौ. सुनीता, माजी आमदार राजीव आवळे यांच्या पत्नी सौ. स्मिता, माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांच्या पत्नी सौ. भाग्यश्री, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष विनायक ऊर्फ अप्पी पाटील आदी दिग्गज रिंगणात होते. यापैकी श्री. मुश्रीफ, के. पी., डोंगळे यांना पराभव स्वीकारावा लागला. 

या वेळी संधी असूनही श्री. मुश्रीफ, के.पी., ए. वाय. यांनी स्वतः किंवा नातेवाइकांना रिंगणात उतरवलेले नाही. श्री. डोंगळे यांच्यासाठीही एक गट सुरक्षित होता. ते स्वतः किंवा नात्यातील कोणालाही रिंगणात उतरवू शकले असते; पण त्यांनी या निवडणुकीपासून अलिप्त राहणे पसंत केले. गेल्या निवडणुकीत थोडक्‍यात पराभव स्वीकारलेले "गोकुळ'चे ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील निवडणुकीच्या तोंडावर भाजपत गेले; पण प्रत्यक्ष न लढण्यावर ते ठाम राहिले. ग्रामस्वच्छता, हागणदारीमुक्त अभियानाच्या माध्यमातून केवळ जिल्ह्यात नव्हे, तर राज्याचे लक्ष वेधून घेतलेले माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांना सातवे गट सुरक्षित असूनही ते बाहेरच थांबले. 

"जनसुराज्य'चे माजी आमदार राजीव आवळे व माजी सदस्य दत्ता घाटगे या दोघांनीही स्वतःच्या सौभाग्यवतींना घुणकीतून उमेदवारी मिळवण्यासाठी ताकद लावली. या दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच "जनसुराज्य'ची उमेदवारी दिल्याने या दोघांनाही थांबावे लागले. या गटात माजी मंत्री विनय कोरे यांनी किणीतील कार्यकर्त्याच्या पत्नीला संधी दिली. जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी यांनाही संधी होती; पण त्यांचे लक्ष्य 2019 ची विधानसभा असल्याने त्यांनी या निवडणुकीपेक्षा विधानसभेचीच मोर्चेबांधणी करण्यावर भर दिला. 

विद्यमान अध्यक्षांना संधी नाही 
आरक्षणामुळे काही दिग्गज विद्यमान व माजी सदस्यांना थांबावे लागले, त्यात विद्यमान अध्यक्षा विमल पाटील यांचा समावेश आहे. त्यांचा सांगरूळ गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित राहिला. विद्यमान उपाध्यक्षांच्या पत्नी, शिक्षण समिती सभापतींच्या पत्नी रिंगणात आहेत. 

हे पाच विद्यमान रिंगणात 
माजी अध्यक्ष उमेश आपटे उत्तूरमधून, माजी सभापती महेश पाटील, माजी मंत्री भरमू पाटील यांच्या स्नुषा ज्योती पाटील, अरुण इंगवले, प्रमोदिनी जाधव व सौ. विजया पाटील हे पाच विद्यमान सदस्य आपापल्या तालुक्‍यातून पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत. 

Web Title: Election out of the Giants