Election Results : साताऱ्यातून राजेंना सर्वाधिक मताधिक्‍य

Satara-Loksabha-Voting
Satara-Loksabha-Voting

कऱ्हाड उत्तर दुसऱ्या, कोरेगाव तिसऱ्या स्थानावर; पाटणमध्ये पाटील अव्वल
सातारा - अत्यंत चुरशीच्या झालेल्या सातारा लोकसभा निवडणुकीच्या निकालात शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये बॅकलॉग भरून काढत सातारा विधानसभा मतदारसंघ खासदार उदयनराजे भोसले यांना सर्वाधिक मताधिक्‍य देणारा मतदारसंघ ठरला आहे. तर, पाटण मतदारसंघाने नरेंद्र पाटील यांना सर्वाधिक मताधिक्‍य दिले.

विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवत सातारा लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेची  केली होती. युती झाल्यामुळे मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. त्यानंतरही भाजपने आपल्या पक्षातील नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळवून दिली. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खंबीरपणे निवडणुकीला सामोरे जात संपूर्ण मतदारसंघात चांगले वातावरण निर्माण केले होते.

लोकांमध्ये चर्चा घडवून आणण्याचे कसबही भाजपने पुरेपूर वापरले. त्यामुळे कधी नव्हे ते निवडणुकीचा अंदाज बांधताना पोलिसही बुचकळ्यात पडले होते. उदयनराजेंचे मताधिक्‍य अत्यंत खाली येईल, असा बहुतांश जणांचा अंदाज होता. मताधिक्‍य घटले. परंतु, तरीही सव्वा लाखांच्यावर मताधिक्‍य मिळविण्यात ते यशस्वी झाले. या मताधिक्‍यामध्ये सर्वाधिक वाटा सातारा विधानसभा मतदारसंघाने उचलला आहे.

मतमोजणी सुरू झाल्यावर सातारा मतदारसंघात उदयनराजेंना पहिल्याच फेरीत फटका बसला होता. तब्बल सात फेऱ्यांपर्यंत नरेंद्र पाटील यांनाच मताधिक्‍य होते. त्यानंतर या मतदारसंघात उदयनराजेंना मताधिक्‍य मिळण्यास सुरवात झाली. रात्री विसाव्या फेरीअखेर हे मताधिक्‍य ३४ हजारांपर्यंत गेले होते. तरीही अन्य मतदारसंघांच्या तुलनेत सातारा पिछाडीवर होता. स्वत:च्या हक्काच्या मतदारसंघातच हा फटका बसला होता. मात्र, शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये साताऱ्याने उदनराजेंना भरभरून साथ दिली. या तीन फेऱ्यांमध्येच सुमारे ११ हजारांचे मताधिक्‍य त्यांना मिळाले. त्यामुळे मतमोजणीच्या शेवटी उदयनराजेंचे मताधिक्‍य ४४ हजार ९५७ वर गेले. त्यामुळे सातारा हा उदयनराजेंना सर्वाधिक मताधिक्‍य देणार मतदारसंघ ठरला. तरीही मागील वेळेपेक्षा जवळपास निम्म्याने उदयनराजेंचे मताधिक्‍य घटले आहे.

कऱ्हाड उत्तर मतदारसंघाने उदयनराजेंना पहिल्यापासून साथ दिली. प्रत्येक फेरीमध्ये त्यांचे मताधिक्‍य वाढत होते. अंतिमत: मतदारसंघात उदयनराजेंना ३८ हजार ९६३ मताधिक्‍य राहिले. त्याच्या खालोखाल कोरेगाव मतदारसंघाने ३३ हजार ४२७ तर, वाई मतदारसंघाने ३२ हजार ३१२ मतांचे 
मताधिक्‍य उदयनराजेंना दिले. या तीनही मतदारसंघांत उदयनराजेंना पहिल्यापासून शेवटपर्यंत मताधिक्‍य राहिले. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना केवळ दोन मतदारसंघांमध्ये मताधिक्‍य मिळाले. त्यातही त्यांच्या स्वत:च्या पाटण मतदारसंघामध्ये त्यांना सर्वाधिक १८ हजार ३१४ मतांचे मताधिक्‍य मिळाले. कऱ्हाड दक्षिणमध्ये त्यांना अपेक्षप्रमाणे मताधिक्‍य मिळाले नाही. दक्षिणमध्ये त्यांना केवळ चार हजार ८२८ मताधिक्‍यावर समाधान मानावे लागले. नरेंद्र पाटील यांना ४० टक्के तर, उदयनराजेंना ५१ टक्के मते मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com