सोलापूर : शिवसेनेला एकच जागा, मात्र त्याची जिल्ह्यात चर्चा | Election results 2019

तात्या लांडगे
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

Election Results 2019 : सोलापूरमध्ये विधानसभा निवडणुकीत मोहोळ, करमाळा, सांगोला येथे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभा झाल्या. मात्र, जिल्ह्यात शिवसेनेला पाचपैकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

सोलापूर : मागील विधानसभा निवडणुकीतील मोदी लाटेला थोपवून करमाळ्यात नारायण पाटील यांनी शिवसेनेचा गड राखला होता. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार वाढावेत म्हणून संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्यावर मातोश्रीने जबाबदारी सोपवली.

निवडणुकीत मोहोळ, करमाळा, सांगोला येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या. मात्र, जिल्ह्यात शिवसेनेला पाचपैकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी दिलेले सर्व उमेदवार पडले आहेत.

- मुक्ताईनगर : खडसेंना मोठा धक्का; कन्या पराभूत : Election Results 2019

करमाळ्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांना बाजूला करीत राष्ट्रवादीतून शिवसेनेचे दाखल झालेल्या रश्‍मी बागल यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. तर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात महेश कोठे यांना डावलून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी दिली. सांगोल्यातून माजी आमदार शहाजी पाटील यांना तर बार्शीतून राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांना आणि मोहोळमधून भाजपचे नागनाथ क्षिरसागर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. मात्र, या सर्वच मतदारसंघात शिवसेनेच्याच नाराजांनी बंडखोरी केली. त्याचा फटका सर्वच उमेदवारांना बसला आणि एकाही उमेदवाराला यश मिळविता आले नाही.

मोहोळमधून मनोज शेजवाल, बार्शीतून भाऊसाहेब आंधळकर, करमाळ्यातून नारायण पाटील, शहर मध्यमधून महेश कोठे यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना डावलून ऐनवेळी पक्षात आलेल्यांनाच उमेदवारीत प्राधान्य देण्यात आले. त्याचा शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. बार्शीतून अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत, करमाळ्यातून अपक्ष उमेदवार संजय शिंदे, सांगोल्यातून शिवसेनेचे शहाजी पाटील, मोहोळमधून राष्ट्रवादीचे यशवंत माने, तर शहर मध्यमधून प्रणिती शिंदे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.

- अखेर सातारकरांनी शरद पवारांना गुलाल उधळायला बाेलावलेच I Election Result 2019

सांगोल्यात सेनेने खाते उघडले

सांगोल्यातून शिवसेनेचे उमेदवार शहाजी पाटील, करमाळ्यातून अपक्ष उमेदवार तथा राष्ट्रवादीचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार संजय शिंदे, मोहोळचे राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने आणि शहर मध्यमध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा विजय निश्‍चित आहे.

- सांगोला : शेकापच्या बालेकिल्ल्यावर भगवा फडकला : Election Result 2019


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results 2019 Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Solapur trends afternoon