सांगलीत वर्षभर रणधुमाळी; कुठे कुठे होणार निवडणुका ? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

सरत्या वर्षात राजकीय पक्षांची मोठी कसोटी लागली होती. आधी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीचा सामना चांगला रंगला. विधानसभा निवडणुकीनंतर सत्तानाट्याने तर अनेकांना हादरवून सोडले. राजकारणातील वेगवेगळे रंग पाहून "राजकारण करावे की नको', असाही विचार अनेकांना केला, मात्र आता पुढील वर्षात पाऊल ठेवत असताना स्थानिक राजकारण लोकांना खुणावू लागले आहेत.

सांगली - राज्यातील सत्तानाट्यानंतर पुढील वर्षी जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी रंगणार आहे. तब्बल 450 ग्रामपंचायती आणि 611 सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या सहकारी संस्थांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सांगली बाजार समिती, राजारामबापू साखर कारखाना, शिक्षक बॅंकेचा प्रामुख्याने समावेश असल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. 

सरत्या वर्षात राजकीय पक्षांची मोठी कसोटी लागली होती. आधी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीचा सामना चांगला रंगला. विधानसभा निवडणुकीनंतर सत्तानाट्याने तर अनेकांना हादरवून सोडले. राजकारणातील वेगवेगळे रंग पाहून "राजकारण करावे की नको', असाही विचार अनेकांना केला, मात्र आता पुढील वर्षात पाऊल ठेवत असताना स्थानिक राजकारण लोकांना खुणावू लागले आहेत. त्यातही सहकारी संस्थांवर आपली पकड असली पाहिजे, हा मोठ्या पक्षांचा, राजकीय नेत्यांना नेहमीच अट्टाहास राहिला आहे. जसे भाजपचे धोरण "बूथ जिंका, निवडणूक जिंका' असे राहिले आहे.

हेही वाचा - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ? 

नव्या राजकीय समीकरणामुळे वाढणार रंगत

तसेच राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे राजकारण हे ग्रामपंचायती, सोसायटी, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या जिंका आणि राजकारणावर पकड मिळवा, असे राहिले आहे. आता एकीकडे भाजप देशभरात नव्याने पक्ष बांधणीला सामोरा जात असताना आताच राज्यात सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून सहकारी संस्थांच्या रणधुमाळीची तयारी सुरू झाली आहे. नव्या राजकीय समीकरणांमुळे जिल्ह्यात रंगत वाढणार आहे. अर्थात, सहकारी संस्थांत राजकीय जोडे बाहेर काढून जाण्याची परंपरा राहिली आहे. तरीही जोडे काढल्यानंतरच्या तडजोडी चुकलेल्या नाहीत. त्या कशा रंग घेणार, याकडे लक्ष असेल. 

हेही वाचा - सत्ता नाट्यानंतर तब्बल 12 दिवसांनी घरी परतले आमदार

संपूर्ण वर्षभर निवडणूका

पुढचे संपूर्ण वर्ष कुठे ना कुठे निवडणुकीची रणधुमाळी चालणार आहे. जानेवारीत 75, फेब्रुवारीत 88, मार्चमध्ये 188, एप्रिलमध्ये 46, मे महिन्यात 20, जूनमध्ये 14, जुलैमध्ये 16, ऑगस्टमध्ये 10, सप्टेंबरला 39, ऑक्‍टोबरला 22, नोव्हेंबरला 45, डिसेंबरला 48 संस्था निवडणुकीला सामोऱ्या जाणार आहेत. 

जिल्ह्यातील संस्था

औद्योगिक संस्था ः 28, खरेदी-विक्री संघ ः 09, नागरी पतसंस्था ः 09, नागरी बॅंका ः 15, पगारदार बॅंका ः 01, पणन संस्था ः 01, प्रक्रिया उद्योग ः 06, फेडरेशन ः 01, ग्राहक संस्था ः 04, विकास सोसायटी ः 506, सेवक पतसंस्था ः 31. 

वर्षभर चालणार हा कार्यक्रम

""जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी आमची तयारी आहे. तालुका पातळीवरही काम सुरू आहे. पुढील वर्षभर हा कार्यक्रम चालणार असल्याने यंत्रणा दक्ष आहे.'' 

- नीळकंठ करे, 
जिल्हा उपनिबंधक, सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elections In Sangli Local Governance And Cooperative Sector