वीज बिल मिळणार आता ‘एसएमएस’द्वारे

विकास जाधव - vikasjsakaal
बुधवार, 21 डिसेंबर 2016

काशीळ - वीज बिल मिळाले नाही, वीज बिल सापडत नाही, मुदत संपल्यावर बिल येत आहे, बिले थकीत गेली, बिले भरण्याची अंतिम मुदत न समजणे आदी समस्यांवर ‘महावितरण’ने उपाय शोधला आहे. कंपनीने ग्राहकांसाठी नवीन ‘एसएमएस’ सेवा सुरू केली आहे. या सेवेतून बिलासंदर्भातील माहिती ग्राहकांना आता मोबाईलवर मिळणार असल्याने ही सेवा सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे. 

काशीळ - वीज बिल मिळाले नाही, वीज बिल सापडत नाही, मुदत संपल्यावर बिल येत आहे, बिले थकीत गेली, बिले भरण्याची अंतिम मुदत न समजणे आदी समस्यांवर ‘महावितरण’ने उपाय शोधला आहे. कंपनीने ग्राहकांसाठी नवीन ‘एसएमएस’ सेवा सुरू केली आहे. या सेवेतून बिलासंदर्भातील माहिती ग्राहकांना आता मोबाईलवर मिळणार असल्याने ही सेवा सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे. 

जिल्ह्यात घरगुती, व्यापारी व औद्योगिक सहा लाख ९३ हजार ४०४, कृषिपंपांचे एक लाख ७७ हजार ५५१ असे एकूण आठ लाख ७० हजार ९५५ ग्राहक आहेत. वीज बिलांसंदर्भात ग्राहकांना अनेक समस्यांना सामारे जावे लागते. त्यामध्ये बिले वेळेत येत नाहीत, अंतिम मुदत संपल्यावर बिले येतात, त्यामुळे बिले वेळेत भरली जात नाहीत. यामुळे अनेकवेळा दंड किंवा वीज कनेक्‍शन तोडले जाते. यांसारख्या अनेक समस्यांनी ग्राहक हैराण होत होते. ही समस्या लक्षात घेऊन ‘महावितरण’ने आता ‘एसएमएस’ सेवा सुरू केली आहे. या सेवेतून ग्राहकांना घरबसल्या माहिती आपल्या मोबाईलवर मिळणार आहे. ही सेवा सुरू करून घेण्यासाठी ‘महावितरण’च्या ग्राहकांनी वीज बिलावर ठळकपणे असलेला ग्राहक क्रमांक हा MRGE_< आपला १२ अंक ग्राहक क्रंमाक > असे टाइप करून आपल्या मोबाईलवरून ९२२५५९२२५५ यावर ‘एसएमएस’ पाठवायचा आहे. हा मोबाईल क्रमांक ‘महावितरण’कडे जतन होणार आहे. त्यानंतर ग्राहकांना असणारी सर्व माहिती मिळणार आहे. एसएमएसप्रमाणे ई- मेलवरही माहिती मिळण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये MRGE_< आपला १२ अंक ग्राहक क्रंमाक > < ईमेल> असे टाईप करून ९२२५५९२२५५ या नंबरवर एसएमएस पाठवायचा आहे. या दोन्ही सेवेतून ग्राहकांना वीज बिल तयार झाले की लगेच मेसेज येणार असून बिल भरण्याची अंतिम मुदत किती आहे, मागील बिल थकीत असेल तर त्याची माहिती मिळणार आहे. तसेच बिल भरण्यासाठी एसएमएसद्वारे ‘अलर्ट’ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तांत्रिक बिघाड, दुरुस्ती यासाठी वीज पुरवठा खंडित केला जातो. हा पुरवठा किती वेळ खंडित राहणार आहे, कधी वीज पूर्ववत होणार आहे. या संदर्भात माहिती एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. यामुळे ग्राहक व शेतकऱ्यांचा या काळातील कामांचे नियोजन किंवा यावर पर्यायी व्यवस्था करता येणार आहे. जिल्ह्यातून या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ग्राहकांपैकी पाच लाख सहा हजार २२० म्हणजे ५८ टक्के ग्राहकांनी नोंदणी केली आहे.     

वीज ग्राहकांच्या मोबाईलची नोंदणीची मोहीम सुरू झाली आहे. जिल्ह्यात ५८ टक्के ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी झालेली आहे. उर्वरित ग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी शाखा किंवा उपविभागीय कार्यालयाशी संपर्क करावा. कार्यालयात संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे आपला ग्राहक व मोबाईल नंबर द्यावा.
- संजय साळे, अधीक्षक अभियंता, सातारा.

‘महावितरण’ ॲप
महावितरण कंपनीने मोबाईलसाठी ‘महावितरण’ ॲप सुरू केले आहे. या ॲपवर नवीन वीज कनेक्‍शन नोंदणी, घर बंद असल्यास मीटर रीडिंग पाठवण्याची सुविधा, वीज बिलांचा तपशील, वीज बिल भरण्याची सुविधा, विजेसंदर्भातील तक्रारी, मोबाईल नंबर अपडेट करणे, सेवाबद्दल फिडबॅक आदी प्रकारच्या सेवा या ॲपवर देण्यात आल्या आहेत. हे ॲप प्लेस्टोअर मधून डाउनलोड करावे. तसेच या ॲप व ‘एसएमएस’ या संदर्भातील माहिती वीज बिलांच्या मागे दिली जात असल्याची माहिती ‘महावितरण’च्या सूत्रांनी दिली आहे.

Web Title: electiricy bill at sms