
मूळचा मुस्लिम धर्मीय असलेल्या आमिरच्या घऱी ना भाऊबीज असते, ना राखी पौर्णिमा... मात्र असतो जागतिक महिला दिन. तो नेहमी बहिणीस वेगवेगळी आणि अनोखी भेट देऊन महिला दिन साजरा करत असतो. यावेळी त्याने तिच्यासाठी ही स्कूटर बनवली आहे.
मिरज (जि. सांगली) ः कोरोना संसर्गकाळात लॉकडाऊनमधील वेळेचा पुरेपूर वापर करीत दिव्यांगासाठी बॅटरीवरील व्हिलचेअर बनविणाऱ्या सुभाषनगर (ता. मिरज) येथील आमिर खान याने आपल्या लाडक्या बहिणीसाठी स्वहस्ते इलेक्ट्रिक स्कूटर बनवली आहे, तीही अवघ्या तीस हजार रुपयांत. या स्कूटरची निर्मिती टाकाऊ साहित्यपासून तयार केल्याचे अमिर सांगतो. मूळचा मुस्लिम धर्मीय असलेल्या आमिरच्या घऱी ना भाऊबीज असते, ना राखी पौर्णिमा... मात्र असतो जागतिक महिला दिन. तो नेहमी बहिणीस वेगवेगळी आणि अनोखी भेट देऊन महिला दिन साजरा करत असतो. यावेळी त्याने तिच्यासाठी ही स्कूटर बनवली आहे.
मूळचा अभियंता असलेल्या अमिरने टाकाऊ वस्तूंचा आधार घेत नवी स्कूटर अवघ्या तीस हजारांत तयार केली. यामध्ये जलद गतीने मोबाईल चार्जिंग, सामान बकेट, लहान मुलांसाठी बेबी बकेट, दोन्ही बाजुंना आरसे अशा सुविधा आहेत. या अफलातून कल्पनेचे त्याने खुशी असे नामकरण केले आहे. ही खुशी दिसायलाही आकर्षक आहे. प्रदूषण विरहित आणि हलकीफुलकी स्कूटर तीन तास चार्जिंग करून पन्नास किलोमीटरपर्यंत आरामात धावू शकते.
आमिर यांनी शिक्षण घेत असताना बॅटरी आणि सौर ऊर्जेवर चालणारी हायब्रिड इलेक्ट्रिक कार तयार केली होती. या कारला केपीआयटी-पुणे या कंपनीची मान्यता प्राप्त झाली. या अनुभवावर त्यांनी दिव्यांग मित्र जुबेर कमालपाशासाठी व्हिलचेअर तयार केली. त्यानंतर महिला दिनी बहिणीस भेट देण्यासाठी स्वहस्ते इलेक्ट्रिक स्कूटर बनवली आहे. यातून प्रदूषण विरहित वाहने वापरण्याचा संदेशही नागरिकांना दिला आहे.
स्कूटर अवघ्या तीस हजारांत तयार
कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा वापर करीत टाकऊ वस्तूंचा वापर करून दिव्यांग व्हिचेअरची संकप्लना सुचली. यातून सोशल डिस्टन्स राखत दिव्यांग व्हिलचेअर तयार झाली. पुन्हा बहिणाला महिला दिनी स्कूटर भेट देण्याच्या उद्देशाने आणि प्रदूषण टाळून निसर्गाचे रक्षण व्हावे या संकल्पनेतून बॅटरीवर चालणारी स्कूटर अवघ्या तीस हजारांत तयार केली.
- अमिर खान, अभियंता, सुभाषनगर
संपादन : युवराज यादव