कनेक्‍शन नसतानाही वीजबिल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

भाडळे - रमाई घरकुल धारकाला विना कनेक्‍शनचेच बोगस वीजबिल आल्यामुळे महावितरण कंपनीच्या चुकीच्या कारभाराचा अनोखा नमुना समोर आला आहे. गावातील वाडी-वस्त्यांवर घरपोच लाइट बिलेच मिळत नसल्याची ओरडही ग्राहकांतून होत आहे.

भाडळे - रमाई घरकुल धारकाला विना कनेक्‍शनचेच बोगस वीजबिल आल्यामुळे महावितरण कंपनीच्या चुकीच्या कारभाराचा अनोखा नमुना समोर आला आहे. गावातील वाडी-वस्त्यांवर घरपोच लाइट बिलेच मिळत नसल्याची ओरडही ग्राहकांतून होत आहे.

भाडळे गावासह परिसरामध्ये अनेक लहान-मोठ्या वस्त्या आहेत. काही वस्त्यांवरील घरांत लाइटची अद्याप सोय नाही, तर ज्या घरांमध्ये लाइट कनेक्‍शन आहेत, त्यांनाही वेळेत बिले घरपोच मिळत नाहीत. त्रासाची सुटका होणे दूरच मात्र महावितरण कंपनीकडून चालू महिन्याच्या बिलाचा वेगळाच नमुना दाखवला. भाडळे येथील रमाई घरकुलचे लाभार्थी विशाल तानाजी खरात यांना रमाई घरकुल योजनेंतर्गत नवीन घरकुल मंजूर झाले होते. त्या घरकुलासाठी त्यांनी महावितरण कंपनीकडे नवीन लाइट कनेक्‍शन मिळण्यासाठी काही दिवसांपूर्वी मागणी केली होती. मात्र, कोणत्याही लाभार्थींना महावितरण कंपनीने लाइटचे नवीन कनेक्‍शन दिले नाही. वारंवार मागणी करूनही महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून 

वेळोवेळी टाळाटाळ करण्यात आली, तर काही वेळा मीटर व इतर साहित्य उपलब्ध नसल्यामुळे कनेक्‍शन देता येत नसल्याचे कारण देण्यात आले. मात्र, कोणतेही वीज कनेक्‍शन नसताना लाइट बिलच हातात आल्यामुळे महावितरणच्या अजब कारभाराचा आणखी एक वेगळाच नमुना समोर आला. या महावितरण कंपनीचे करायचे तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांना पडला आहे.

घरपोच वीज बिले मिळत नसल्याने अडचण
घरपोच लाइट बिलेच पोचत नसल्याच्या अनेक लेखी व तोंडी तक्रारी महावितरण कंपनीच्या संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. तरीही अद्याप या वाडी-वस्त्यांवर लाइट बिलेच पोचत नाहीत. मात्र, दोन- तीन महिन्याला वसुलीसाठी कर्मचारी न चुकता येऊन दंडासह बिलाच्या रकमेची सक्तीने वसुली करून जातो.

Web Title: Electricity bill with out connection